दिवाळी-चथसाठी १२,००० विशेष गाड्या
देशभरात विविध मार्गांवर जादा गाड्या : गेल्यावर्षीपेक्षा 4,500 अधिक गाड्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात दिवाळी आणि छठपूजेसाठी घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने व्यापक तयारी केली आहे. यंदा एकूण 12,000 जादा रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ही व्यवस्था 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान लागू असेल. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी साडेचार हजार अधिक विशेष गाड्या चालवल्या जातील. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी यासंबंधी माहिती शेअर केली आहे. तसेच वंदे भारत स्लीपर कोचसंबंधी महत्त्वाची माहिती जारी करताना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात वंदे भारत स्लीपर गाड्या धावतील, असेही त्यांनी जाहीर केले.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या घोषणा केल्या. दिवाळी आणि छठपूजेदरम्यान गेल्यावर्षी 7,500 विशेष गाड्या चालवल्या होत्या. यंदा त्यात वाढ करून आतापर्यंत 10,000 गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. अजूनही दोन हजार गाड्या प्रवाशांची गरज लक्षात घेऊन जाहीर केल्या जातील. एकंदर दिवाळी आणि छठ सणांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने 12,000 हून अधिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त, 150 अनारक्षित गाड्या स्टँडबायवर असून गरज पडल्यास तात्काळ आरक्षित करता येतील, असे अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले. यंदा सणासुदीमध्ये लोक सुरक्षित आणि आरामात त्यांच्या घरी पोहोचतील याची दक्षता रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्यावर्षीच्या तुलनेत विशेष गाड्यांची संख्या दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीच्या उत्सवाच्या काळात प्रवाशांना अधिक गाड्या आणि सुविधांचा आनंद घेता येईल. जादा रेल्वेगाड्या 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान धावतील. याव्यतिरिक्त गरज पडल्यास संबंधित मार्गांवर गाड्या तात्काळ चालवता याव्यात म्हणून अनेक गाड्या राखीव ठेवण्यात येणार आहेत. यावर्षी छठ, दिवाळी आणि दुर्गापूजेदरम्यान रेल्वेने घरी जाणाऱ्या लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. रेल्वेने नियमित गाड्यांसोबत 12,000 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 10,000 गाड्या आधीच जाहीर करण्यात आल्या असून प्रवासी बुकिंग करत असल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबासह आरामात प्रवास करता येणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचीही सुविधा
बऱ्याच काळापासून वाट पाहत असलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे. ही ट्रेन तयार असून त्याची चाचणी घेण्यात आली आहे. या ट्रेनसाठी शहरे आणि मार्ग निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून 10 ऑक्टोबरपर्यंत त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनही प्रवाशांसाठी उपलब्ध होतील, असे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या उपलब्धतेमुळे लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होणार आहे.
परतीच्या तिकिटांवर 20 टक्के सूट
13 ते 26 ऑक्टोबर दरम्यान प्रवास करणाऱ्या आणि 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान परतणाऱ्या प्रवाशांना परतीच्या तिकिटांवर 20 टक्के सूट मिळणार असल्याचेही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. या निर्णयामुळे सणांमध्ये मोठ्या संख्येने प्रवाशांना दिलासा मिळेल. रेल्वेने गया आणि दिल्ली, सहरसा आणि अमृतसर, छपरा आणि दिल्ली आणि मुझफ्फरपूर आणि हैदराबाद दरम्यान धावणाऱ्या चार नवीन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त वैशाली, हाजीपूर, सोनपूर, पटना, राजगीर, गया आणि कोडरमा यासारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडणारी एक नवीन बुद्ध सर्किट ट्रेन सुरू केल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटन सुलभ होणार आहे.
पंजाबसाठी नवीन योजना जाहीर
पंजाबमध्ये रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. नवीन राजपुरा-मोहाली रेल्वेमार्ग 18 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 443 कोटी रुपये खर्च येईल. फिरोजपूर कॅन्ट ते दिल्ली मार्गे बहादूरगड आणि पटियाला अशी नवीन वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. 2009-2014 दरम्यान पंजाबसाठी बजेट फक्त 225 कोटी रुपये होते, तर आज ते 5,421 कोटी रुपये झाले आहे. ही रक्कम राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि नवीन प्रकल्पांना गती देण्यासाठी वापरली जाईल.
……… ..
Comments are closed.