मराठा 'श्यामच्या आई' चे गौरव

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित : शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा 1 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. मंगळवारी या सर्व विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार सोहळ्यादरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘नाळ 2‘ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्रिशा विवेक ठोसरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मंगळवारी नवी दिल्लीत विज्ञान भवन  येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा आपले नाव उज्ज्वल केले. सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ पुरस्कार मिळाला आहे. या सोहळ्यात शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी आणि मोहनलाल सारख्या अनेक कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम कलाकारांना त्यांच्या अमूल्य योगदानासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘श्यामची आई’साठी अमृता अरुणराव यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला. यावेळी त्यांनी खास निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान करत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या मराठमोळ्या अंदाजाने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मान वाढवला. साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित ‘श्यामची आई’ ही कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. ‘श्यामची आई’ने मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून दिला आहे.

मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानासाठी मल्याळी अभिनेता ‘मोहनलाल’ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. तीन दिवसांपूर्वीच मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व मोहनलाल यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता. 2023 साठीचा हा पुरस्कार त्यांना मंगळवारी 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. मोहनलाल यांनी आपल्या बहुमुखी अभिनयाने मल्याळमपुरतेच नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 400 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करताना त्यांनी अॅक्शन, कॉमेडी, रोमँस ते सामाजिक विषयांवरील भूमिका सहजतेने साकारल्या. त्यांच्या नावावर 5 राष्ट्रीय पुरस्कार, 9 राज्य पुरस्कार, तसेच पद्मभूषण आणि पद्मश्री यांसारखे उच्च सन्मान आहेत.

Comments are closed.