शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर जाणार; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार, संजय राऊत यांनी दिली माहिती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 25 जून रोजी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडलेले असताना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाड्याची दैना उडाली आहे. शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली असून शेतातील माती, घरं पशुधन वाहून गेले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील साधारण 70 लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. शेतकऱ्यांची घरं, पशुधन नष्ट झाले आहे. साधारण 36 लाख शेतकऱ्यांना महापुराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे पिक, पशुधन, घरं-दारं वाहून गेली आणि 9 लाख कोटींचे कर्ज असलेल्या सरकारने 2,215 रुपये कागदावर मंजूर केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून 10 हजार कोटींची मागणी केली आहे. ती मिळाल्याशिवाय मराठवाडा उभा राहणार नाही. उभा राहण्यासाठी फार वेळ लागेल, पण सध्याच्या परिस्थितीत तग धरणार नाही. त्यामुळे 10 हजार कोटी तात्काळ मराठवाड्याच्या पुरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली, असेही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांचा खडा सवाल

मराठवाड्यात आता आपल्या सही, शिक्क्यांच्या, चिन्हाच्या पिशव्यातून मदत वाटण्याचे काम सुरू आहे. म्हणजे किती निर्लज्जपणा? लोक मरताहेत आणि मुडद्यांचे राजकारण तुम्ही करताय. भगव्या पिशव्या, त्याच्यावर तुमचे फोटो, तुमच्या पक्षाचे चिन्ह हे राजकारण करण्याचे आणि प्रचार करण्याचे कोणते निर्लज्ज तंत्र अवलंबलेले आहे? असा सवाल राऊत यांनी केला.

तर स्वत:च्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा

एका बाजुला भाजपचा वेगळा कारभार, दुसऱ्या बाजुला मिंधे गटाचे वेगळेच सुरू आहे. त्यानंतर अजित पवार गटही येईल. म्हणजे इथे सुद्धा स्पर्धा चालली आहे. लोक मरताहेत, आक्रोश चालला आहे. लोक वाहून जााताहेत. म्हणजे अशा प्रकारे निर्दयीपणे काम करणारे सरकार या राज्यामध्ये आहे. किमान माणुसकी नाही, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती. पैशाची एवढी मस्ती असेल तर स्वत:च्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा? ठेकेदाराकडून लुटलेले, शक्तीपीठ, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोकळा करा आणि आबालवृद्ध, तरुण, विद्यार्थी, महिलांना मदत करा, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.

Comments are closed.