परतीचा पाऊस पाच दिवस धुमाकूळ घालणार; IMD ने दिला सतर्कतेचा इशारा, मुंबईला ऑरेंज अलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून गुरं-ढोरं वाहून गेली आहेत. घरं, दुकानं पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करण्यात येत आहे. काही ठिकाणी एनडीआरएफच्या बोटींच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. अशातच हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजामुळे राज्यावर आलेले हे अस्मान संकट इतक्यात टळणार नसल्याचे दिसते.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र आणि लगतच्या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टाबंगालच्या उपसागरात तयार होईल आणि त्यानंतर त्यांची वाटचाल आपल्या महाराष्ट्राकडे सुरू होईल. याकाळात कमी वेळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे पूर येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क रहावे.

मुंबईला ऑरेंज अलर्ट

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात आठवड्याच्या शेवटी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी 27 सप्टेंबर रोजी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुसळधार पावसासोबत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

Comments are closed.