Nanded News – विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले, शहरातील सखल भागात पाणी शिरले; 274 जणांचे निवारा केंद्रात स्थलांतर

पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे मंगळवारी रात्री प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. नांदेड शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्फत मंगळवारी रात्रीपासून एकूण दहा निवारा केंद्रात 274 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. गोवर्धनघाट स्मशानभूमी पूर्णतः पाण्याखाली असून, दासगणू घाटावरुन पाणी वाहत असल्याने हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

जी.एम.कॉलनी, दुल्हेशाह नगर, गाडीपुरा, कालापुरा परिसर, गंगाचाळ, भिमघाट, नावघाट गल्ली परिसर, पाकीजानगर, बिलालनगर, शंकरनगर, वसरणी आदी सखल भागात पुराचे पाणी पसरले. गोदावरीने धोक्याची पातळी गाठल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. आर.के.फंक्शन हॉल, राजर्षी शाहू विद्यालय, नृसिंह विद्या मंदिर, गांधी राष्ट्रीय विद्यालय, किल्ला, नवनिहाल शाळा, खडकपुरा, मार्कडेय मंदिर, लिबर्टी फंक्शन हॉल, जिल्हा परिषद शाळा वसरणी या दहा केंद्रात पूरग्रस्तांची निवारा, चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असून, या भागात मदतकार्य वेगाने सुरु आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसापासून गोवर्धनघाट स्मशानभूमी पूर्णतः पाण्याखाली असून यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे सिडको स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. नावघाट व बंदाघाट येथील मंदिरे पाण्याखाली आली आहेत. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. दासगणू घाट पूल पूर्णतः पाण्याखाली असून, सिडको भागातून नांदेड शहरात येणारी वाहतूक या मार्गावरुन बंद करण्यात आली आहे.

बॅक वॉटरमध्ये किशोरवयीन मुलगा बुडाला

नांदेड शहरात गोदावरी नदीचे पाणी अनेक भागात शिरले आहे. दुल्हेशाह रहेमान नगर येथील बॅक वॉटरमध्ये बुधवारी सकाळी शेख मिन्हाज शेख साजीद (16) हा मुलगा पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढत शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

दुसरीकडे पंचवटी नगरात बॅक वॉटरमध्ये अडकलेल्या महालाबाई विठ्ठलराव महात्मे या 72 वर्षीय महिलेला पाण्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. महापालिकेचे अग्निशमन अधिकारी के.एस.दासरे व त्यांच्या सहकार्‍यांनी तात्काळ त्या घटनास्थळी पोहंचवून सदर महिलेचा जीव वाचवला.

Comments are closed.