‘आयसीसी’कडून अमेरिका निलंबित तरीही अमेरिकन संघ टी-20 वर्ल्ड कप, ऑलिम्पिकमध्ये खेळणार
अवघ्या जगाला धक्का देणाऱया अमेरिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थातच आयसीसाने धक्का दिला आहे. आयसीसीने नियमभंगाचा ठपका ठेवत ‘यूएसए क्रिकेट’ला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘यूएसएसी’ आता ‘आयसीसी’च्या पूर्ण सदस्यत्वाशी संबंधित अधिकारांचा वापर करू शकणार नाही. मात्र अमेरिकन क्रिकेट संघाला आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत, तसेच 2028 मध्ये होणाऱया लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीत सहभागी होण्याची परवानगी मिळणार आहे.
या कारवाईनंतरही ‘यूएसएसी’ला सुधारण्यासाठी संधी देण्यात येईल आणि त्याच्या कामकाजावर लक्ष ठेवले जाईल, जेणेकरून भविष्यात निलंबन हटविता येईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले. हा निर्णय अमेरिकेत क्रिकेट अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्याची प्रतिमा उंचाविण्यासाठी घेतला गेला आहे.
आयसीसीने ‘यूएसएसी’ला 2024 च्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नियमांचे पालन न केल्याबद्दल नोटीस दिली होती. त्यांना कामकाजात सुधारणा करण्यासाठी 12 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, मात्र यूएसएसीला या मुदतीमध्ये निवडणुका घेता आल्या नाहीत, प्रशासकीय ढाच्यात सुधारणा करता आल्या नाहीत. ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक समितीकडून (यूएसओपीसी) ‘राष्ट्रीय क्रीडा महासंघाचा दर्जा मिळविण्यात आवश्यक प्रगती नाही. शिवाय ‘यूएसएसी’च्या काही कृतींमुळे आयसीसीचीच प्रतिमा मलीन झाली.
अमेरिकन क्रिकेटला सुधारण्याची संधी
आयसीसी’ने स्पष्ट केले आहे की, या निलंबनाचा परिणाम अमेरिकन संघांच्या सहभागावर होणार नाही.
फेब्रुवारी 2026 मध्ये हिंदुस्थान व श्रीलंकेत होणाऱ्या, टी-20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेचा संघ खेळणार आहे.
लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्येही पुरुष व महिला क्रिकेट संघांचा सहभाग राहणार आहे.
राष्ट्रीय संघांच्या तात्पुरत्या व्यवस्थापनाची जबाबदारी आयसीसी स्वतः सांभाळेल.
Comments are closed.