हे फक्त बिहारमध्ये घडते …

कुत्र्याच्या गळ्यात साखळी अडकवून त्याला फिरवणे, ही बाब सर्वसामान्य आहे. कुत्रा पाळलेल्या प्रत्येकाला हे करावेच लागते. तो एक दैनंदिन कार्यक्रम असतो. तथापि, माणसाला गिळून टाकू शकेल, अशा मोठ्या मगरीला जर कोणी तिच्या गळ्यात दोरी बांधून चालविले, तर काय होईल ? असे करता येणे शक्य नाही, असे आपल्याला वाटेल. पण बिहारमध्ये नुकताच नेमका हाच प्रकार घडला आहे.

या राज्यातील मुंगेर येथे काही लोकांनी एका मगरीला अशा प्रकारे चालविले आहे. मुंगेर जिल्ह्याच्या हरिनमार दियारा येथे ही घटना घडली. हा भाग गंडक या नदीच्या काठावर आहे. यंदा अतिवृष्टी झाल्याने या नदीला प्रचंड महापूर आला. त्यामुळे नेहमी नदीच्या पात्रात असणाऱ्या मगरी या पुराच्या पाण्यासमवेत गावात घुसून या भागात आल्या. गावातील एका मच्छीमाराने मासे पकडण्यासाठी नदीत जाळे टाकले होते. मात्र, जाळ्यात मासे अडकण्याएवजी ही मगर अडकली. ते पाहून हा मच्छीमार प्रथम घाबरला. कारण ही मगर आकाराने बरीच मोठी होती. तथापि, नंतर त्याने या मगरीलाच नियंत्रणात आणले आणि तिच्या गळ्यात दोरी बांधली. तिच्या पायांनाही दोरीने जखडण्यात आले. वास्तविक असे करणे अत्यंत धोक्याचे होते. कारण मगर हा अतिशय बलवान भूजलचर जीव आहे. त्याच्यासमोर माणसाची शक्ती अत्यंत कमी आहे. तथापि, हा मच्छीमार आणि त्याचे काही सहकारी यांनी या मगरीला बळकट अशा दोरीला जखडले आणि एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे गावातून फिरविले. मगर पूर्णपणे बांधली गेल्याने तिला स्वत:ची सुटका करुन घेता आली नाही. या घटनेचे व्हिडीओ चित्रण काही गावकऱ्यांनी केले असून ते सोशल मिडियावर प्रसारित करण्यात आले आहे. असा प्रकार केवळ बिहारमध्येच घडू शकतो. अन्यत्र तो कधीच घडणार नाही, अशी प्रतिक्रिया यामुळेच निर्माण झाली आहे. बिहारमध्ये अशी अचाट कृत्ये नेहमी घडतात. येथील लोक देशाच्या इतर भागांमधील लोकांपेक्षा वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत, हे कारण यासाठी दिले जात आहे. पुरात सापडलेल्या मगरीला कुत्र्याप्रमाणे बांधून फिरविण्याचा असा प्रकार भारतात किंवा कदाचित जगातही इतरत्र कोठे घढला असणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.