पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, उद्धव ठाकरे यांची मागणी

पंतप्रधानांना सांगतोय की, पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये द्या, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच सरकसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत. आणि ती मागणी सरकारने मान्य केली नाही तर, शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

कर्जमाफीची मागणी लावून धरणार, सरकारकडून कामे करून घेणार; उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटून उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. उद्धव ठाकरे यांनी तालूर, धाराशीव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

“ही एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा”

आज मी मुद्दाम मराठवाड्यातल्या जनतेला दिलासा द्यायला आलेलो आहे. जसं मुख्यमंत्री म्हणाले की, यात राजकारण आणू नये, तसं मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही किंवा मी आणू इच्छित नाही. मात्र त्याच बरोबरीने जर का सरकारकडून होणारी मदत ही तुटपुंजी असेल तर ती स्वीकारता येणार नाही. जो काही आकडा आहे तो मान्य करता येणार नाही. या प्रकारचं संकट बऱ्याच वर्षांनंतर एवढं भीषण संकट मराठवाड्यावरती कोसळलेलं आहे. जमिनीच्या जमिनी खरडून गेलेल्या आहे. पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, पिकं सडून गेलेली आहेत. घरंदारं, गुरंढोरं, शेळ्यामेंढ्या वाहून गेली आहेत. एकूणच नुसतं शेतीच नाही तर इथल्या शेतकऱ्यांचं आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलं आहे. सरकारने जी काही मदत देऊ केलेली आहे ती फारच तुटपुंजी आहे. जर का आपण हिशेब मांडला साधरणतः एकरी साडेतीन ते चार हजार रुपये येतात. आता जे काही झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी खर्च दुपटीने येणार आहे. म्हणजे ही एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा सरकार करतंय. पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं. आणि तिथल्या ‘आप’ सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्याने दिलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेत जाहीर केलेली आहे ती जवळपास हेक्टरी ५० हजार रुपये आहे. पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला ५० हजार रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल, सातबारा कोरा करण्याची मागणी

“दीड हजार रुपयात लाडक्या बहिणीचं घर सावरलं जाणार आहे का?”

आम्हाला याच्यात राजकारण आणयचं नाही. पण गाडीमध्ये मोबाईलवर मी चॅनेलवरच्या काही बातम्या पाहिल्या. त्याच्यात आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्ही लाडक्या बहिणींवरती ४५ हजार कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना. ही मस्ती आहे. ४५ हजार कोटी वर्षाला तुम्ही जर का खर्च करत असाल पण लाडक्या बहीण योजनेतून जे दीड हजार रुपये त्या बहिणीच्या घरी दिले जाताहेत त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत दीड हजार रुपयांत सावरलं जाणार आहे का? त्याचं उत्तरही उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

“सरकसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत.”

मुलांच्या शिक्षणाची सगळी वाट लागली आहे. घरंदारं, पुस्तकं, दप्तरं, वह्या वाहून गेलेल्या आहेत. आणि त्याच्यात भरीसभर म्हणून पीकविम्याची तर वाईटच परिस्थिती आहे. तो तर एक घोटाळाच आहे. बँकांच्या नोटीसा आता शेतकऱ्यांना यायला लागल्या आहेत. मी सर्व शिवसैनिकांना सांगितलं आहे आणि शेतकऱ्यांनाही सांगतोय की, तुमच्याकडे येणाऱ्या बँकाच्या नोटीसा एकत्र करा आणि आपल्या नजिकच्या शिवसेना शाखेत नेऊन द्या. त्याचं पुढे काय करायचं ते आम्ही बघतो. ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो त्यांची मागणी आम्ही लावून धरणार आहोत. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जशी कर्जमुक्ती केली होती, पण अजूनही शेतकरी ती कर्जमुक्ती विसरलेला नाही. तशीच कर्जमुक्तीची आता गरज आहे. आणि यावेळेला शेतकरी म्हणताहेत, सरकसकट कर्जमुक्त करा, कर्जमाफ करा. मुख्यमंत्री जे वारंवार सांगतात की आम्ही योग्यवेळी करू. म्हणजे तुम्ही निवडणुका आल्यावर जसं 2019 मध्ये तुम्ही कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्यातही एवढ्या अटी-शर्ती टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एकवेळ गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको. शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की, एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की, तुमची योग्य वेळ ही काय, तुम्ही पंचाग बघून सांगणार की कधी योग्य वेळ आहे? मुहूर्त काढून सांगणार आहात का? शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे. सरकसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत. आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर, शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.

Photo – आम्ही बळीराजासोबत! उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची केली पाहणी

“पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही?”

कर्जमुक्ती झाली आणि मग मदतीचं काय? मदत जशी पंजाब सरकारने केलेली आहे की हेक्टरी 50 हजार रुपये ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आता कोणीतरी म्हणेल की, एवढे पैसे आणायचे कुठून? हा एक धुळफेकीचा प्रकार आहे. केंद्र सरकारने खरं म्हणजे मदत केली पाहिजे. जसं मी एक बातमी वाचली. बिहारमध्ये निवडणुका येताहेत. आणि बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यात स्वतः हून 10 हजार रुपये टाकलेत. जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून टाकल्याची अशी ती बातमी आहे. मग मी पंतप्रधानांना सांगतोय की, तुम्ही सुद्धा एकतर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करण्याची जबाबदारी घ्या. किती पैसे द्यायचे? कुठून पैसे द्यायचे? आपण सगळे विसरला असाल म्हणून आठवण करून देतो की, जेव्हा करोनाचं संकट आलं होतं तेव्हा पीएम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला. ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही. ज्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळत नाही. मागितली तरी मिळत नाही. सगळं काही गुप्त आहे. पण कानावर आलं होतं की, करोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडात गोळा केले गेले. पंतप्रधानांना सांगतोय की, पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये द्या. एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये. म्हणून ही काही जबाबदारी ही पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे. पुन्हा सांगतो, पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्या पीएम केअर फंडामध्ये आहेत. जर पीएम केअर फंड आता वापरणार नसाल? मुख्यमंत्र्याची योग्य वेळ आता येणार नसेल तर योग्य वेळ येणार कधी? आणि पीएम कोणाची केअर घेताहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या? असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Comments are closed.