जिंदाल आणि आंग्रे पोर्टची ओव्हरलोड वाहतूक! जयगड-हातखंबा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

मागील काही महिन्यात जयगड ते हातखंबा या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अपघातात अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. जयगड ते हातखंबा रस्त्यावरून जेएसडब्ल्यू पोर्ट आणि आंग्रे पोर्ट या कंपन्यांची वाहतूक सुरू आहे. या कंपन्याच्या ओव्हलोड आणि अनियंत्रित वेगवान वाहतुकीमुळे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशाच एका अपघातात 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने अशा अनियंत्रित आणि ओव्हरलोड वाहतुकीविरोधात पुढील आठवड्यापर्यंत कडक पावले उचलली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश गवाणकर यांनी दिला आहे. संस्थेच्या वतीने नायब तहसीलदारांना आज निवेदन देण्यात आले आहे.

खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेने दिलेल्या निवेदनात 2005 पासून जयगड परिसरात जेएसडब्ल्यू पोर्ट आणि आंग्रे पोर्ट यांच्या माध्यमातून या रस्त्यावरून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरवात झाली. सुरवातीला या दोन्ही पोर्टची व्याप्ती कमी प्रमाणात असल्यामुळे फारसा त्रास जाणवत नव्हता. मात्र मागील 10 वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक, खराब रस्ते व चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे या रस्त्यावर महिन्यातून किमान एका तरी निष्पाप नागरिकाचा बळी जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावर प्रशासनाकडून मात्र कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. या रस्त्यावर अनेक शाळा, महाविद्यालये देखील आहेत. त्यामुळे या शाळेत महाविद्यालयामध्ये येणारे पालक देखील चिंतेत आहेत. अनेकदा या रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक ठप्प असते. एकंदरीत या सर्व कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. प्रशासनाने गांभीर्याने या बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पुढील आठ दिवसात योग्य ती कार्यवाही, उपयोजना झाली नाही तर या तालुक्यातील जनता हजारोंच्या संख्येने रस्तावर उतरेल. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या रस्तावर कोणतीही मालवाहतूक होणार नाही. याला जबादार प्रशासनातील संबंधित विभाग असतील, असा निर्वाणीचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

Comments are closed.