पुणे बाजार समितीत सचिवांच्या केबिनमध्ये गुंडाशाही, बाहेरून पोरे आणून दबावतंत्र

पुणे बाजार समितीचे सचिव डॉ.राजाराम धोंडकर यांच्या केबिनमध्ये गुरुवारी दुपारी मोठा राडा झाला. बाजार समिती संचालक मंडळाच्या ठरावांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनाच्या पदाधिकार्‍यांवर बाजार समितीने बाहेरून पोरे आणून दबाव तंत्राचा वापर केल्याचे दिसून आले. यामुळे बाजार समितीत गुंडाशाहीचा नवीन पायंडा पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू आहे. संचालक मंडळांच्या ठरावांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शरद गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पत्रव्यवहार करून माहिती मागविली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक यांनी बाजार समितीला लवांडे यांना माहिती देण्यास सांगितले होते. विकास लवांडे यांच्यासह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास बाजार समितीचे सचिव डॉ.राजाराम धोंडकर यांच्या केबिनमध्ये गेले होते. लवांडे आले समजताच सभापती प्रकाश जगताप आणि काही संचालक सचिवांच्या केबिनमध्ये येऊन लवांडे आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या भोवती बसले. यावेळी बाजार समितीच्या माहिती देण्यावरून शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या पोरांना सचिवांच्या केबिनमध्ये पाचारण करत दहशत माजवण्याचा प्रकाराने वातावरण गरम झाल्याचे सांगण्यात आले. या घटनांमध्ये उपस्थित एका पत्रकाराने व्हिडीओ शुटींग करण्याचा प्रयत्न केला असता त्यास मज्जाव करण्यात आला. तसेच, आमचे शुटिंग करू नको असे हावभाव बाहेरील मुले करत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे.

विकास लवांडे यांना माहिती देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक आणि एआर यांनी बाजार समितीला पत्र दिले होते. याबाबत माहितीची लवांडे यांनी मागणी केली. मात्र, संचालक मंडळाच्या बैठकीसमोर यावर निर्णय घेतला जाईल असे त्यांना सांगितले. मात्र, आम्हाला आत्ताच माहिती पाहिजे त्याशिवाय जाणार नाही अशी त्यांनी अरेरावी केली. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याप्रकरणी विकास लवांडे यांच्यासह इतरांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत पोलीसांत पत्र दिले आहे.
– प्रकाश जगताप, सचिव, बाजार समिती, पुणे

वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असताना सभापती, सचिवांकडून माहिती दिली जात नाही. गैरकारभार उघड होऊ नये माहीतीस टाळाटाळ केली जाते. त्यामुळे सभापती जगताप यांनी सचिवांच्या केबिनमध्ये २५ गुंडांना घेऊन दहशत माजवली. आमचा अपमान केला. पालकमंत्री अजित पवार यांनी पाठबळ दिल्याने ही लोक मस्तवाल आहे. त्यामुळे शासन या चुकीच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत.
– विकास लवांडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी शरद पवार गट

Comments are closed.