हिंदुस्थान ‘अ’ विजयापासून 243 धावा दूर, दुसरी अनधिकृत कसोटी रोमहर्षक स्थितीत

पहिल्या डावात 226 धावांनी पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अफलातून मारा करीत ऑस्ट्रेलिया ‘अ’ चा दुसरा डाव अवघ्या 185 धावात गुंडाळत संघाला पुन्हा सामन्यात आणण्याची करामत केली. 412 धावांचा पाठलाग करणाऱ्या हिंदुस्थान ‘अ’ ला के. एल. राहुल आणि साई सुदर्शन यांच्या दमदार खेळींनी अनधिकृत दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 169 अशी मजल मारून दिली आहे. शुक्रवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी हिंदुस्थानी ‘अ’ संघाच्या फलंदाजांना विजयासाठी 243 धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे.

दुसऱ्या डावात हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला केवळ 185 धावांत गारद केले. पहिल्या गावात ऑस्ट्रेलियन संघाने 420 धावांचा पल्ला गाठला होता, मात्र दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजसह गुरूनूर ब्रार, मानव सुथार आणि यश ठाकूर यांनी ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकू दिले नाही. परिणामतः पाहुण्यांचा संघ 200 धावांच्या आत कोसळला. ब्रार आणि सुथार यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट टिपले.

मॅकस्विनीची एकाकी झुंज

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार नॅथन मॅकस्विनीने (85 नाबाद) धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने यष्टिरक्षक जोश फिलिप (50) सोबत 90 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण इतर फलंदाज लवकर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 185 धावांवर थांबला. तिसऱ्या दिवसखेरीस हिंदुस्थानने 169/2 अशी मजल मारली आहे. सामना रोमहर्षक स्थितीत असल्यामुळे दोघांनाही विजयाची समान संधी आहे. हिंदुस्थानी संघाला अजून 243 धावा हव्या असून ऑस्ट्रेलियन संघ विजयापासून आठ विकेट दूर आहे. दोन्ही संघ चौथ्या दिवशी कसा खेळ करतात यावरच सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.

हिंदुस्थानचा आत्मविश्वासपूर्ण पाठलाग

412 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याच्या पाठलागाची सुरुवात नारायण जगदीशन (36) आणि राहुलने केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. टॉड मर्फीने जगदीशनला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सुधर्शनने राहुलसोबत चांगली जोडी जमवत संघाचा डाव पुढे नेला. राहुल पूर्णपणे फिट नसतानाही त्याने 74 धावांची दमदार खेळी केली आणि नंतर तो निवृत्त झाला. दिवसाच्या अखेरीस सुदर्शन नाबाद राहिला, तर मानव सुथार ‘नाईट वॉचमन’ म्हणून खेळपट्टीवर टिकून राहिला.

Comments are closed.