पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा!! उद्धव ठाकरे यांची मागणी!
कोरोना संकटात पीएम केअर फंड निर्माण केला होता. त्यात लाखो कोटी रुपये जमा झाले होते. त्या फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मराठवाडय़ात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बीड येथे पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बिहार निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकल्याची बातमी आहे. आता पंतप्रधानांनीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही कर्जमुक्त करावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी किती पैसे द्यायचे आणि कुठून द्यायचे, असा प्रश्न पडला असेल तर पीएम केअर फंडाची आठवण करून देतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोरोना काळात निर्माण केलेल्या पीएम केअर फंडाचा मायबाप कोण आहे हे अजूनही कळलेले नाही. माहिती अधिकारातही त्याची माहिती मागूनही मिळत नाही. सर्व काही गुप्त ठेवले गेले आहे. त्या पीएम केअर फंडात त्या वेळी लाखो कोटी रुपये जमा झाले होते. तो पीएम केअर फंड आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वापरा नाहीतर शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
विश्वगुरू म्हणून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची काळजी घ्यायला हवी. पीएम केअर फंड आता वापरणार नसाल, मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आता येणार नसेल तर ती कधी येणार आणि पंतप्रधान नेमकी कोणाची केअर घेणार, याचे उत्तर द्या, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
आम्ही राजकारण आणत नाही. तुम्हीही आणू नका. तुमची मदतीची घोषणा त्रोटक आहे. मदत मोठय़ा प्रमाणात व्हावी. कागदावरच राहू नये. अधिकारी आडमुठेपणाने वागले तर शिवसैनिक जाब विचारणारच.
महाराष्ट्रातील अतिवृष्टी ही राष्ट्रीय आपत्तीच
महाराष्ट्रातील अतिवृष्टीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी, असा या मागणीचा अर्थ आहे का असे या वेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर महाराष्ट्र राष्ट्रात येत नाही का, पंजाब राष्ट्रात येत नाही का, राष्ट्र म्हणजे काय केवळ गुजरात आहे का महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे धान्य संपूर्ण देशात जात असेल तर ही राष्ट्रीय आपत्ती का नसावी, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
या वेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे उपस्थित होते.
लाडक्या बहिणींना पैसे देताय म्हणजे उपकार करताय का?
महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर 45 हजार कोटी खर्च करतोय असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. लाडक्या बहिणींना देताय म्हणून काय उपकार करताय का, त्या दीड हजारात मराठवाडय़ातील मायभगिनींचा उद्ध्वस्त संसार सावरणार आहे का, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना रस्त्यावर उतरणार
मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्याची जाहिरात आम्ही केली नाही. तशाच कर्जमुक्तीची आता गरज आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
पंजाबप्रमाणे हेक्टरी 50 हजार रुपये द्या
शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरे यांनी ताशेरे ओढले. मराठवाडय़ावर पहिल्यांदाच इतके मोठे संकट कोसळले आहे. सरकारने देऊ केलेली मदत फारच तुटपुंजी आहे. हिशेब मांडला तर एकरी साडेतीन हजार रुपये मिळतील. पंजाबमधील आप सरकारने तिथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना कालबद्ध हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर केली. पंजाबसारखे राज्य देतेय तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Comments are closed.