41 वर्षांची प्रतीक्षा संपली! आशिया कप फायनलमध्ये पहिल्यांदाच भारताच्या समोर पाकिस्तान, पाहा कोणाचं पारडं जड!
आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट अंतिम सामना होणार आहे. रविवारी, 28 सप्टेंबर रोजी दुबईत रात्री 8 वाजता हा सामना रंगणार आहे. भारतीय संघाने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. लीग आणि सुपर-4 मध्ये भारताने पाकिस्तानला दोनदा हरवले असून आता अंतिम फेरीत हॅट्ट्रिक विजय साधण्याचे लक्ष्य आहे.
भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 मध्ये एकूण 8 वेळा आशियाचा किताब जिंकला आहे. दुसरीकडे पाकिस्तानने केवळ 2 वेळा, 2000 आणि 2012 मध्ये, आशिया कप जिंकला आहे. त्यामुळे या वेळीही भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.
भारताविरूद्ध पाकिस्तान
आसिया कप हेड टू हेड रेकॉर्ड
एकूण सामने – 20
भारत विजयी – 12
पाकिस्तान विजयी – 6
अनिर्णीत – 2
या स्पर्धेत भारताचा प्रवास अत्यंत दमदार राहिला. संघाने यूएई, पाकिस्तान, ओमान आणि बांग्लादेशवर एकतर्फी विजय मिळवत अपराजितपणे अंतिम फेरी गाठली. पाकिस्तानचा प्रवास मात्र चढ-उतारांचा होता. भारताविरुद्ध दोन सामने गमावल्यावर त्यांनी श्रीलंका आणि बांग्लादेशला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाकिस्तानने शेवटचा आशिया कपचा अंतिम सामना 2022 मध्ये खेळला होता, तर भारताने 2023 मध्ये श्रीलंकेवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून आठव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले होते.
आता दुबईत होणाऱ्या या महामुकाबल्यात भारत 9व्यांदा विजेतेपद जिंकतो की पाकिस्तान बदला घेत तिसरा किताब मिळवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Comments are closed.