शेतकऱ्यांना सरसकट 50 हजारांची मदत करा; जयंत पाटील यांची मागणी

माढा, मोहोळ, कुर्डूवाडी परिसरातील शेतकऱ्यांवर निसर्गाची आपत्ती कोसळली असून, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे पंचनामे करण्याच्या भानगडीत न पडता, महायुती सरकारने पूरग्रस्तांना तातडीने 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

आमदार जयंत पाटील यांनी आज माढा तालुक्यातील खैराव, वाकाव भागातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी आमदार अभिजित पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, प्रा. संदीप साठे, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘माढा आणि मोहोळ तालुक्यांतील अनेक गावांमध्ये 65 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे गावेच्या गावे पाण्याखाली गेली. त्यामुळे पंचनामे करून वेळ घालविण्याची गरज नाही. जेथे जमिनी खरडून गेल्या असतील, तेथे एकरी 30 हजार रुपये मदत सरकारने द्यावी, तर सरसकट 50 हजारांची मदत करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.

Comments are closed.