आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का, आयसीसीची हॅरिस राऊफवर मोठी कारवाई


दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील  21 सप्टेंबरच्या सामन्यात पाकच्या साहिबजादा फरहान आणि हॅरिस राऊफनं आक्षेपार्ह वर्तन केलं होतं. याबाबत बीसीसीआयनं या दोघांची आयसीसीकडे तक्रार केली होती. आयसीसीनं बीसीसीआयच्या तक्रारीच्या आधारे हॅरिस राऊफवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर, साहिबजादा फरहानला समज देण्यात आली आहे.

आयसीसीनं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस राऊफ याच्यावर 30 टक्के दंड लावला आहे. साहिबजादा फरहान याला देखील आयसीसीनं वॉर्निंग दिली आहे.  मात्र, फरहान याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.

पाकिस्तानच्या टीमच्या हॉटेलमध्ये बीसीसीआयच्या तक्रारीवर सुनावणी पार पडली. आयसीसीचे मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी सुनावणी घेतली. यावेळी दोन्ही खेळाडूंना बोलावण्यात आलं होतं. दोन्ही खेळाडूंनी लेखी जबाब देखील सादर केले. सुनावणी वेळी पाकिस्तानच्या टीमचे मॅनेजर नवीद अकरम चीमा उपस्थित होते.

आशिया चषकाशी संबंधित सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार आयसीसी मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी शुक्रवार म्हणजे आज दुपारी सुनावणी पूर्ण केली होती. आक्रमक वर्तनासाठी हॅरिस राऊफ याच्या मॅच फीच्या 30 टक्के दंड लावण्यात आला आहे. साहिबजादा फरहान याला वॉर्निंग देऊन सोडण्यात आलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील पहिला 14 सप्टेंबरला झाला होता. तो भारतानं जिंकला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये 21 सप्टेंबरला आमने सामने आले होते. यामॅचमध्ये भारताविरुद्ध फलंदाजी करताना साहिबजादा फरहान यानं अर्धशतक केल्यानंतर गनशॉट फायरिंग स्टाइल सेलीब्रेशन केलं होतं. यावरुन त्याच्यावर जोरदार टीका केली होती.

हॅरिस राऊफ यानं भारतीय चाहत्यांकडून कोहली कोहली असा जयघोष केल्यानंतर 6-0 असा इशारा केला होता. ते पाकिस्तानच्या भारताची विमानं पाडल्याच्या कथित दाव्याशी संबंधित होतं. हॅरिस राऊफनं अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना देखील  अपशब्द वापरले होते.

साहिबजादा फरहान यानं अर्धशतक केल्यानंतर सेलिब्रेट केलं नव्हतं, अचानक त्यादिवशी सेलिब्रेट करावं असं वाटलं. त्यामुळं ते केलं. लोक त्याकडे कोणत्या दृष्टीनं पाहतात याची पर्वा नसल्याचं ते म्हणाले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.