पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करा! युवासेनेची राज्यपालांकडे मागणी

विदर्भ, मराठवाडय़ासह राज्यातील अनेक जिह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना तातडीने सर्वतोपरी मदत करा, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांच्या वतीने राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. त्यामुळे अनेक सेवाभावी संस्था, शासन आपल्या परीने मदत करीतच आहे. मात्र शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण (उच्च व तंत्रज्ञान) शिक्षण विभागाचे प्रमुख आहात. त्यामुळे आपण दोन्ही विभागांना तातडीने शैक्षणिक वस्तूंचे वाटप आणि शक्य असेल तिथे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणीही युवासेनेकडून करण्यात आली. याबाबत युवासेना सिनेट सदस्य आणि शिवसेना उपनेत्या शीतल शेठ-देवरुखकर, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांच्या वतीने राज्यपालांना ऑनलाईन निवेदन देण्यात आले आहे.

Comments are closed.