मुंबईचा वैभवशाली इतिहास मिळणार आता एका क्लिकवर, डिजिटल लायब्ररी करण्याच्या कामाला सुरुवात; छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा उपक्रम

>> प्रचंड अहिरराव

मुंबईतील ऐतिहासिक वास्तू, जुन्या इमारती, मैदाने, थिएटर्स काळाआड जात आहेत. असे असताना मुंबईचा वैभवशाली इतिहास पुसला जाऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने स्तुत्य प्रकल्प हाती घेतला आहे. द सिटी अ‍ॅज आर्काइव्ह या प्रकल्पाद्वारे मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहे.

मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंना आधुनिक युगातही डिजिटल रूपात जिवंत ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबईचे महासंचालक सब्यसाची मुखर्जी यांनी मुंबईच्या ऐतिहासिक इमारतींची डिजिटल लायब्ररी हा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. ही डिजिटल लायब्ररी एक ‘वन-स्टॉप’ प्लॅटफॉर्म असेल जिथे विद्यार्थी, संशोधक, वास्तुविशारद, तसेच सर्वसामान्य नागरिक शहरातील समृद्ध ऐतिहासिक वारशाची माहिती मिळवू शकतील. या प्रकल्पात लोक सहभाग आवश्यक असून विविध ऐतिहासिक वास्तूंविषयी त्यांच्याकडे असलेले फोटो, व्हिडीओ किंवा त्यासंदर्भातील दुर्मिळ माहिती असल्यास ती माहिती [email protected] वर द्यावी, असे आवाहन सब्यसाची मुखर्जी यांनी केले आहे.

या उपक्रमासाठी एक विशेष वेब-इंटरफेस तयार केला जाणार आहे. यातून युजर्स मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा सखोल अभ्यास करू शकतील. यामुळे शहरातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि त्याबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होईल, अशी माहिती प्राध्यापक मुस्तनशीर दळवी यांनी दै. ‘सामना’ला दिली. नकाशा आणि इतर माहितीच्या आधारे शहराचा पुनर्विकास करताना ही डिजिटल लायब्ररी एक उपयुक्त संसाधन ठरू शकेल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्राध्यापिका डॉ. मंजिरी कामत यांनी व्यक्त केला.

Comments are closed.