सोनम वांगचुक यांना अटक केली

लेहमधील हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई

वृत्तसंस्था/ लेह

लडाख पोलिसांनी शुक्रवारी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली. राज्याचा दर्जा आणि राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये या प्रदेशाचा समावेश करण्याच्या मागणीसाठी लेहमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ही कारवाई केल्याचा दावा केला जात आहे. तथापि, वांगचुक यांच्यावरील आरोप अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत. सरकारने हिंसक निदर्शनांसाठी वांगचुक यांना जबाबदार धरले आहे. त्यांनी गंभीर शब्द वापरून कार्यकर्त्यांना भडकावल्याचा आरोप केला जात आहे.

सोनम वांगचुक यांना डीजीपी एस. डी. सिंह जामवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांच्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखचा (एसईसीएमओएल) ‘एफसीआरए’ परवाना रद्द केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पर्यावरणवादी कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने ‘एसईसीएमओएल’वर केलेली ही कारवाई संघटनेच्या खात्यांमध्ये आढळलेल्या अनेक कथित विसंगतींवर आधारित होती. यामध्ये स्वीडनमधून निधी हस्तांतरणाचा समावेश होता. हे निधी हस्तांतरण राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध असल्याचे गृह खात्याच्या तपासात आढळून आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांना दुपारी 2:30 वाजता लडाखचे डीजीपी जामवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली. तथापि, त्यांच्यावरील आरोपांना अद्याप अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही. वांगचुक यांच्या अटकेनंतर लेहमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच ब्रॉडबँड सेवेची गतीही कमी करण्यात आली. दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी सोनम वांगचुक यांच्या अटकेला दुर्दैवी असे म्हणतानाच केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच आम आदमी पक्षाने शुक्रवारी सायंकाळी दिल्लीतील जंतर-मंतर येथे वांगचुक यांच्या अटकेचा निषेध केला.

लेहमध्ये कर्फ्यू सुरूच

लेह शहरात सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू सुरूच आहे. लेह एपेक्स बॉडीने पुकारलेल्या बंददरम्यान झालेल्या व्यापक संघर्षात चार जणांचा मृत्यू आणि जवळपास 90 जण जखमी झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी हे निर्बंध लादण्यात आले. दंगलविरोधी उपकरणांसह पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तीन दिवसांनंतरही रस्त्यावर गस्त घालत आहेत. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 50 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोकांना आवश्यक वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून दिवसातील ठराविक वेळेसाठी कर्फ्यू शिथिल केला जाऊ शकतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लेहमधील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

जिल्हा दंडाधिकारी रोमिल सिंग डोंक यांनी लेहमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कारगिलमध्येही कर्फ्यू लागू असून तेथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात आहेत. तथापि, कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने पुकारलेल्या दिवसभराच्या बंदनंतर शुक्रवारी दुकाने आणि व्यापारी संकुले पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्यपालांची परिस्थितीवर नजर

लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता हे सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. परिस्थिती सुधारत असून लवकरच सामान्य होण्याची अपेक्षा शुक्रवारी सायंकाळी त्यांनी व्यक्त केली. येथील शैक्षणिक संस्था तात्पुरत्या बंद असून कलम 163 लागू करण्यात आले आहे. येत्या एक-दोन दिवसांत परिस्थिती सामान्य होईल. लडाखच्या परंपरा आणि वातावरणाचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला आहे. सोनम वांगचुक यांच्या संघटनेवर केलेल्या कारवाईबाबत बोलताना पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात आली असून अशा लोकांवरही अशीच कारवाई होणे स्वाभाविक आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Comments are closed.