शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर बरेलीमध्ये दंगली

वृत्तसंस्था/बेअरली (उत्तर प्रदेश)

उत्तर प्रदेशातील बरेली येथे दोन समाजघटकांमध्ये दंगल उसळली आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर ही दंगल उसळल्याची माहिती देण्यात आली. नमाज झाल्यानंतर एका जमावाने रस्त्यावर येऊन अत्यंत भडक आणि प्रक्षोभक घोषणा दिल्या. या घोषणांमुळे तणाव निर्माण झाला. या तणावाचे पर्यवसान दंगलीत झाले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी घोषणा देणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी लाठीहल्ला केला. त्यात काही दंगलखोर जखमी झाले.

ही दंगल आय लव्ह मोहम्मद या घोषणेच्या प्रकारातून निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश आणि भारताच्या अनेक शहरांमध्ये सध्या ‘आय लव्ह मोहम्मद’ असा आशय असणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. त्यांनी अनेकांनी आक्षेप घेतला आहे. बरेली येथे मौलाना तौकरी रझा याने शुक्रवारचा नमाज झाल्यानंतर मुस्लीमांनी शहरातील मैदानात एकत्र यावे आणि आय लव्ह मोहम्मद या प्रकरणात आपली शक्ती दाखवून द्यावी, असे प्रक्षोभक आवाहन केले होते. त्यानंतर नमाजासाठी जमा झालेले लोक इस्लामिया मैदानाकडे जाऊ लागले. यावेळी हजारो लोकांनी प्रक्षोभक घोषणा दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या काही नळकांड्या फोडाव्या लागल्या. या प्रकरणात मौलाना रझाला अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. हाच मौलाना बरेलीत 2010 मध्ये झालेल्या मोठ्या दंगलीचा सूत्रधार होता, असाही आरोप करण्यात येत आहे. दंगल आता शमली असल्याची माहिती आहे.

 

Comments are closed.