Latur News- लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट; नद्या-नाल्यांना पूर, रस्ते-पूल पाण्याखाली
लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान लातूर मधील निलंगा येथे महादेव मंदिराच्या शेजारी असलेल्या श्री स्वामी समर्थ मठातील श्री राम मंदिर मंदिराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
श्री स्वामी समर्थ मठ हा समर्थ सांप्रदायाचा साधारणपणे 1650 च्या दरम्यान स्थापन झालेला मठ आहे. स्वतः समर्थ रामदास स्वामी हे निलंगा येथे आले होते व त्यांनी 32 शिराळा येथील त्यांचे शिष्य आनंद स्वामी यांची या मठाचे मठपती म्हणून नेमणूक केली होती.
कालौघात या मंदिरात जुन्या बांधकामाची बरेचदा दुरुस्ती झालेली असणार. मात्र अता सतत चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे राममंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील पाठीमागची म्हणजेच पश्चिमेची भींतीचा भाग कोसळला आहे.
रोहिणा गावाचा संपर्क तुटला
चाकूर तालुक्यातील मौजे रोहिणा हे गाव अंबिका देवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते पण पावसामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला आहे.
उजळंब ते रोहिना जाणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे रस्ता बंद आहे तसेच रोहिना गाव ते अंबिका देवी मंदिर तालुका चाकुर जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे सध्या वाहतूक बंद आहे. औसा तालुक्यातील मौजे आशिव – आशिव तांडा पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदी पात्रात 22621 क्यूसेक्स विसर्ग सुरू
माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा आवक लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने
27 सप्टेंबर रोजी ठीक 9:45 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण 12 द्वारे हे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.तसेच तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढ करण्यात आला आहे.
सद्यःस्थितीत एकूण 12 वक्रद्वारे 50 सेंटिमीटरने चालू असून एकूण 22621 क्यूसेक्स (640.59) क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.