ठाण्याच्या ऐतिहासिक मध्यवर्ती कारागृहावर बिल्डर लॉबीचा डोळा, तुरुंग हलवला तर आंदोलन करू; भाजप आमदार केळकर यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना खरमरीत पत्र

स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक क्रांतिकारकांना जुलमी ब्रिटिशांनी ठाण्याच्या कारागृहात डांबले होते. या ऐतिहासिक कारागृहावर बिल्डरांचा डोळा असून त्यावर टोलेजंग टॉवर बांधण्याचे मनसुबे असल्याचा भंडाफोड भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेला हा तुरुंग दुसरीकडे हलवला तर मोठे आंदोलन छेडू, असा इशाराही केळकर यांनी दिला असून यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे.
ठाण्यातील अनेक भूखंडांवर बिल्डरधार्जिण्या राजकारण्यांची वक्रदृष्टी आहे. आता त्यांनी आपला मोर्चा कारागृहाकडे वळवला असून आज भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ठाण्याचे कारागृह दुसरीकडे हलवू नका, अशी विनंती केली होती. मात्र अद्यापि सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. काही बिल्डरधार्जिण्यांकडून कारागृह हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
मोकळ्या जागेवरच इमारत उभारा
ठाणे कारागृहामध्ये कैदी ठेवण्याची क्षमता 1 हजार 105 एवढी असताना प्रत्यक्षात 4 हजार 400 कैदी अक्षरशः कोंबण्यात आले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने सध्या असलेल्या कारागृहाच्या मोकळ्या जागेवरच वाढीव इमारती बांधाव्यात किंवा हे कारागृह चालू ठेवून अन्य उपल ब्ध जागेवर नवे कारागृह बांधावे, अशी सूचनाही पत्रात करण्यात आली आहे. कारागृह बिल्डरांच्या घशात जाता कामा नये. अन्यथा तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
Comments are closed.