‘त्यांना तोडायलाच हवे…’, भारताविरुद्ध सामन्यापूर्वी अख्तरने पाकिस्तान टीमला धाडला मेसेज


भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक अंतिम 2025: भारत आणि पाकिस्तान आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सामना रविवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेत तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. यापूर्वी झालेल्या दोन्ही लढतींमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, पाकिस्तानला या संपूर्ण स्पर्धेत भारताव्यतिरिक्त कोणत्याही संघाने पराभूत केलेले नाही. त्यामुळेच अंतिम सामना अतिशय चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताविरुद्ध सामन्यापूर्वी त्यांच्या संघाला मेसेज धाडला आहे.

‘पाकिस्तानकडे भारतासारख्या संघाला हरवण्याची ताकद…’

माजी पाक वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान क्रिकेट संघाला सल्ला दिला आहे की, भारतीय संघ किती ताकदवान आहे, हे विसरुन तुम्हाला अंतिम सामन्यात खेळावे लागेल. भारताने याआधी या स्पर्धेत दोनदा पाकिस्तानला हरवले आहे. अख्तर याने गेल्या काही आठवड्यांत पाकिस्तानवर टीका केली होती, पण गुरुवारी रात्री बांगलादेशवर विजय मिळवत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी संघाचं कौतुक केलं आणि सांगितलं की, पाकिस्तानकडे भारतासारख्या अपराजित संघाला हरवण्याची ताकद आहे.

अख्तर एका पाकिस्तानी टीव्हीवर म्हणाला की, “आपल्याला भारताची ही हवा फोडावी लागेल. जसं आपण बांगलादेशविरुद्ध लढलो, तसंच भारताविरुद्ध उतरावं लागेल. पाकिस्तानने हे विचारणं थांबवायला हवं की आपल्याला 20 षटके गोलंदाजी करायची आहेत, असा विचार केला पाहिजे की, आपल्याला विकेट घ्यायच्या आहेत. आपण त्यांना आऊट करण्यासाठी उतरू, तेव्हा भारतालाही जाणवेल की धावा करणे सोपं नाही. यावेळी आपल्याला त्यांना तोडावंच लागेल.”

तो पुढे म्हणाला की, “आपल्याकडे शाहीन शाह आफ्रिदी असा नंबर वन वेगवान गोलंदाज आहे. हारिस रऊफसुद्धा जगातील कोणत्याही गोलंदाजाइतकी वेगवान गोलंदाजी करत आहे. जर आपण ही मानसिकता ठेवली, तर काही अडचण नाही.”

अभिषेक शर्मा बाबत अख्तर काय म्हणाला?

अख्तर म्हणाला की, “आपल्याला अभिषेकला पहिल्या दोन षटकांतच बाद करावं लागेल. तो आत्तापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. जर तो लवकर बाद झाला, तर भारतावर दडपण येईल. आतापर्यंत भारताला त्याच्याकडून चांगली सुरुवात मिळाली आहे. पण जर अभिषेक लवकर गेला, तर भारत दबावाखाली येईल.”

शेवटी अख्तर म्हणाला की, “भारत कितीही चांगला खेळला, तरी पाकिस्तानला कमी लेखू नका. ही टीम फायनलमध्ये नेहमी काहीतरी वेगळं करते. मग संघ कमकुवत असो किंवा खेळ खराब असो, फायनलमध्ये पाकिस्तान अचानक उत्तम क्रिकेट खेळतो आणि  जिंकतो. असं अनेक वेळा झालं आहे, आणि मला वाटतं यावेळीही तसंच होईल.”

हे ही वाचा –

Mumbai Ranji Trophy 2025-26 Squad : मुंबई संघात मोठा बदल, नवीन कर्णधाराची घोषणा; यशस्वी जैस्वाल बाहेर, रहाणे अन् सरफराजची एन्ट्री

आणखी वाचा

Comments are closed.