पाकिस्तानविरुद्धच्या फायनल मॅचपूर्वी टीम इंडिया तावुनसुलाखून निघाली, नेमकं काय घडलं?


आयएनडी वि एसएल एशिया कप 2025: आशिया कप स्पर्धेत शुक्रवारी भारत आणि श्रीलंका याच्यात रंगलेल्या सुपर-4 स्टेजच्या शेवटचा सामना कमालीचा थरारक झाला. या सामन्यात दोन्ही संघांचा स्कोअर सेम झाल्याने सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपरओव्हर (Super Over) खेळवावी लागली. यामध्ये भारतीय संघाला विजय मिळाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर (Ind Vs SL) विजयासाठी 203 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. श्रीलंकेच्या  पथुमा निसांका (Pathum Nissanka) याने 58 चेंडूत 107 धावांची खेळी करत स्वत:च्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते. मात्र, शेवटच्या षटकात पथुमा निसांका बाद झाला आणि हा सामना श्रीलंकेच्या हातातून निसटला. भारताने हा अटीतटीचा सामना जिंकून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असली तरी या सामन्यात श्रीलंकेने भारताच्या तोंडाला अक्षरश: फेस आणला होता. या सामन्यात भारतीय संघातील काही उणीवा समोर असल्या तरी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी (Ind Vs Pak Final) भारतीय संघाच्यादृष्टीने काही चांगल्या गोष्टीही घडल्या आहेत.

Team India: भारतीय संघाची विजय लय कायम राहिली

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पथुमा निसांकाच्या वादळी खेळीमुळे एक वेळ अशी आली होती की, भारतीय संघ हा सामना हारणार असे वाटत होते. क्रिकेट समालोचक आणि स्क्रीनवर दाखवण्यात येणाऱ्या विश्लेषणानुसार, हा सामना पूर्पपणे श्रीलंकेच्या बाजूने झुकला होता. मात्र, भारतीय संघाने शांत राहत शेवटच्या षटकात हा सामना फिरवला होता. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना हरला नव्हता. श्रीलंकेविरुद्धचा सामना औपचारिकता असल्याने तो हरल्यास भारतीय संघाला काहीच फरक पडणार नव्हता. मात्र, हा सामना हरला असता तर टीम इंडियाची विजयी लय खंडित झाली असती. क्रिकेटमध्ये मोमेंटम हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही चांगली कामगिरी करुनही मोक्याच्या क्षणी मोमेंटम तुमच्या बाजूने नसले तर अनेक सामन्यांचे निकाल बदलताना दिसून आले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धचा सामना हरली असती तर विजयी मोमेंटम ब्रेक झाले असते. याचा कुठेतरी टीम इंडियाच्या मनोबलावर परिणाम झाला असता.

Ind VS SRI Asia Cup Match: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया तावुनसुलाखून निघाली

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंतचे जवळपास सर्व सामने सहजपणे जिंकले आहेत. थोडीफार अडचण वगळता भारतीय संघाचा या स्पर्धेत म्हणावा तसा कस लागला नव्हता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना एक रिअॅलिटी चेक मिळाला. आपल्याला गाफील राहून चालणार नाही, हे भारतीय संघाला उमगले. यापूर्वीच्या बहुतांश सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांच्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला होता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या पातळ्यांवरही संघाचा कस लागला आणि भारताने विजयही मिळवला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यापूर्वी टीम इंडिया तावुनसुलाखून निघाली, असे म्हणता येईल.

Asia Cup Team India: भारतीय संघाच्या मधल्या फळीची आश्वासक कामगिरी

यंदाच्या आशिया कप स्पर्धेत भारतीय फलंदाजी म्हणजे अभिषेक शर्मा असेच समीकरण होऊन गेले होते. भारताचे सलामीचे फलंदाज वगळता मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांची कामगिरी आश्वासक नव्हती. एकट्या अभिषेक शर्मावर अवलंबून राहिल्यामुळे फायनलमध्ये टीम इंडियाला धोका होता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी भारतीय संघाचा डाव सावरला. संजू सॅमसन याने 39 धावा केल्या. तर तिलक वर्माने नाबाद 49 धावा केल्या. या दोघांनी भारतीय संघाची धावगती सातत्याने 10-11च्या आसपास राहील, याची काळजी घेतली. त्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा ओलांडू शकला. त्यामुळे फायनलमध्ये भारतीय संघ हा पूर्णपणे अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर विसंबून नसेल, ही बाब आश्वासक म्हणावी लागेल.

Jaspirt Bumrha: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी महत्त्वाच्या खेळाडूंना पुरेशी विश्रांती

श्रीलंकेविरुद्धचा सामना फारसा महत्त्वाचा नसल्याने टीम इंडियाने या मॅचमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांना विश्रांती दिली होती. तर हार्दिक पांड्याही केवळ एक षटक टाकून पॅव्हेलिनयमध्ये माघारी परतला होता. त्याचे स्नायू दुखावल्याची माहिती समोर आली होती. ही दुखापत वाढली असती तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट नसता. त्यामुळे टीम इंडियाने कोणताही धोका न पत्कारता हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी फारकाळ मैदानात राहून दिले नाही. परिणामी पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी बुमराह आणि हार्दिक पांड्या हे दोन्ही खेळाडू ताजेतवाने असतील.

Team India VS Srilanka: दबावाच्या परिस्थितीतही टीम इंडियाने सामना फिरवला

आशिया कप स्पर्धेत शुक्रवारी पहिल्यांदाच श्रीलंकेविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा कस लागला. श्रीलंकेच्या पथुमा निसांका याच्यासमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले होते. एकावेळेला हा सामना भारत हरेल, असे वाटत होते. भारतीय गोलंदाज प्रचंड दबावाखाली होते. मात्र, यावेळी भारतीय संघाने एखाद्या कसलेल्या व्यावसायिक संघाप्रमाणे खेळ करत योग्य संधी येण्याची वाट पाहिली आणि हा सामना फिरवला. त्यामुळे पुन्हा एकदा मानसिक दबावाखाली असताना भारतीय खेळाडू आपली कामगिरी उंचावतात, हे दिसून आले. अंतिम फेरीचा सामन्यात संघांवर निश्चितच मोठे दडपण असते. अशा परिस्थितीत सायकॉलॉजिकल प्रेशर हा घटक महत्त्वाचा ठरतो. श्रीलंकेमुळे भारतीय संघाने अंतिम सामन्यापूर्वी अशी परिस्थिती अनुभवली आणि त्यामधून मार्ग काढला. अंतिम सामन्यात ही गोष्ट भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरणार आहे.

आणखी वाचा

भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा पथुम निसांका सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला का उतरला नाही? समोर आलं मोठं कारण

आणखी वाचा

Comments are closed.