पीएम केअर म्हणजे कुणाची केअर? प्रस्तावाची कसली वाट बघता, हेक्टरी ५० हजारांची मदत द्या! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
पीएम केअर फंडातून पंतप्रधानांनी किमान महाराष्ट्राला 50 हजार कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं. नाही तर मग पीएम कोणाची केअर घेताहेत? पीएम केअर म्हणजे कोणाची केअर? असा सवाल उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव पाठवा असे म्हणणऱ्या पंतप्रधानांना आणि राज्य सरकारलाही धारेवर धरले आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. आणि त्याला हेक्टरी 50 हजार रुपये मदत करा, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
https://www.youtube.com/watch?v=3xtipc75onk
मराठाड्यातील पूरस्थिती, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे माध्यमांशी संवाद साधला. माझ्यासोबत संजय राऊत, अंबादास दानवे, ओमराजे, कैलास पाटील, शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह मी मराठवाड्याची भेट घेतली. आजपर्यंत अस्मानी संकट, आपत्ती आलेली नाही, असे नाही. परंतु यावेळची आपत्ती ही भयानक आणि भीषण आहे. जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी ही परिस्थिती आहे. आणि मी बोलतोय याही वेळेला मराठवाड्यात काही भागांमध्ये जोरात पाऊस सुरू आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास, हा केवळ शेतकऱ्यांचा नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे. अनेकांच्या जमिनी खरवडून गेलेल्या आहेत. पिकं तर उद्ध्वस्त झालीच घरंदारं वाहून गेलेली आहेत. जे मुलंबाळं आहेत त्यांची वह्यापुस्तकं, एका अर्थी पाहिलं तर त्यांचं अख्खं आयुष्य वाहून गेलेलं आहे. आणि या संकटात भरीसभर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझं आहे, अशी मराठवाड्यातील भीषण परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
साधारणतः एक वर्ष होईल. महाराष्ट्राच्या विधानसभा होत होत्या. तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. असंतोष एवढ्यासाठी होता की, त्यांच्या हाती पिक होतं. सोयाबीन, कापूस होता. आताचं सरकार तेव्हा होतं. पण हमीभाव देत नव्हते. हमीभाव खूप कमी देत होते. दुर्दैवाने आता असं झालंय. की होत्याचं नव्हतं झालं. पिक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्धवस्त झालेलं आहे. आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस असेल. ती पिकं उद्ध्वस्त झाली होती, सडली होती. त्याचा वास येत होता. शेतामध्ये ढोपरभर चिखल आणि पाणी होतं. शेतकरी धाय मोकलून रडत होते. मी गेल्यानंतर शेतकरी आपुलकीने, हक्काने माझ्याशी बोलले. आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी करायला या सरकारला भाग पाडा, हे ते आवर्जून आणि आक्रोश करून सांगत होते. आता हीच खरी वेळ आहे शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि संकटातून बाहेर काढायला पाहिजे. जी काही मदत जाहीर केली आहे सरकारने ती खूपच तूटपुंज आहे. एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली, त्यांना नुकसान भरपाई दिली तर तो हंगाम शेतकरी कसातरी तग धरू शकतो. मात्र यावेळा शेतजमीनच खरवडून गेली आहे. आजूबाजूला वाहणाऱ्या नद्यांचं पाणी शेतांमध्ये घुसलं आणि अख्खी जमीन खरवडून गेली ज्याला म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे? वरचं पिक तर गेलं जमिनीवरची माती गेली आणि अक्षरशः दगड, गोटे आणि मुरूम वर आलेला आहे. ही जमीन पुन्हा पिक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान तीन ते पाच वर्षे लागतील, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. आता ही जर का वस्तुस्ती आहे, तर शेतकऱ्याला आता जी काय या सरकारने मदत जाहीर केलेली आहे ती मदत जर का पाहिली तर जेमतेम हेक्टरी सात-आठ हजार होते. पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः सात हजार रुपये एकराला खर्च येणार आहे. त्यानंतर माती टाकायची, ती कसण्यायोग्य करायची याला खूप मेहनत लागणार पैसा लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पिक काढायला लागेल. पण दोन-तीन वर्षे याच्यात जात आहेत. पण आता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा? त्यांच्या मुलांची जी काही वह्या पुस्तकं वाहून गेली आहेत ती पुस्तकं कशी घ्यायची या चिंतेमध्ये शेतकरी आहे, अशी भायन स्थिती उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
रोज कुठेना कुठेतरी आत्महत्यांच्या बातम्या येताहेत. मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका घरात गेलो. आणि खरंच तिथलं वातावरण बघून मन सुन्न झालं. 31 वर्षांच्या एका पोराने आत्महत्या केली. त्याला जेमतेम 15-20 दिवसांचं बाळ आहे. एक मोठं एकत्र कुटुंब, हा कर्ता पोरगा, डोक्यावरती दोन लाखाचं कर्जाचं ओझं होतं. आता ही जी काही त्यांची थट्टा चालली आहे. भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. गेल्या दोन-तीन वर्षांतली 14 हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्याच्यानंतर 2017 च्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे. त्याच्यानंतर आमचं सरकार आलं. आम्ही कर्जमुक्ती केली. कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली. त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले देखील. आणि ज्या-ज्या वेळेले संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो. आता मुख्यमंत्री म्हणताहेत मला याच्यात राजकारण आणायचं नाही. पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, मदत करा, असं बोलणं याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं. याचं कारण की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्याने मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यावर म्हणाले, ये बाबा राजकारण करू नको. आणि त्याच्या मागे पोलीस लागले. मग ही कुठली लोकशाही आहे, कुठलं सरकार आहे, कशासाठी तुम्ही राज्य करताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानी करता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी यावेळी उद्धव ठाकरे यांनी दाखवली. त्यात अतिवृष्टी, चक्रिवादळ आहे . हे साधारणतः मार्च 2023 पासून गेल्या काही वर्षांतली आहे. म्हणजे साधरणतः 14 हजार कोटी रुपयांची जाहीर झालेली रक्कम अजून त्यांच्या हातात मिळालेली नाही. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की, शेतकऱ्याला सरकट कर्जमुक्त केलं पाहिजे. आणि त्याच बरोबरीने ज्या प्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50 हजार रुपये मदत ही कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेल आहेत, याला म्हणतात सरकार. तसेच पंजाबमध्ये 1600 आणि हिमाचल प्रदेशला 1500 कोटींची मदत पंतप्रधानांनी केली आहे. अजूनही आपल्याकडे केलेली नाहीये. पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी 50 हजार रुपये जाहीर केलेल आहेत तसंच महाराष्ट्रातल्या डबल इंजिन सरकारने, म्हणजे डबल इंजिन आहे ना, आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे. म्हणजे डबल इंजिन आणि किती त्याला डबे लागलेले आहेत याची कल्पना नाहीये. परत वरचे आहेच धूर सोडणारे इंजिन त्यांची मदत घ्या. कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले. आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं? दिसतंय समोर त्याच्यात चर्चा काय करताय? आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की, तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा. कसला प्रस्ताव? तुमच्या समोर दिसतंय, असे उद्धव ठाकरे यांनी फटकारले.
आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीत का? बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आताच तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी दहा-दहा हजार रुपये 75 लाख महिलांच्या खात्यात केंद्राकडून टाकले आहेत. म्हणजे तुमची मतचोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी करायला निघालात. बिहार तुम्हाला काय खरेदी-विक्रीची गोष्ट वाटली. अजूनही आमच्या लक्षात आहे की, पाच-सात वर्षांपूर्वी बिहारच्या निवडणुकांमध्ये याच पंतप्रधानांनी जवळपास सव्वा लाख कोटीची मदत जाहीर केली होती. ती मदत मिळाली की नाही? याची कल्पना नाही. बिहारला मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय? हे कुचकामी सरकार आहे. आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून मी विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. आणि तुम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये हे तात्काळ जाहीर करून कालबद्ध स्वरुपात त्याचं वाटप करा. बँकांच्या नोटीसी शेतकऱ्याला जाताहेत त्या पहिल्या नोटीसी थांबवा. आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्या प्रमाणे काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे जी थकबाकी आहे ती थकबाकीला साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थकहमी देतं. आता काही हजार कोटींची त्यांनी थकहमी दिली. म्हणजे तुम्ही कर्जबुडवलं तर सरकार जबाबदारी घेईल तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे. शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं. अगदी बायकोचं मगळसुत्रं, जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसुत्रं चोरून दुसऱ्यांना कोणाला देतील. त्या शेतकऱ्याच्या मंगळसुत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मला आता एका गोष्टीवरती गाढ विश्वास बसलेला आहे की भाजपला प्रशासन चालवता येत नाही. ना केंद्र सरकार म्हणून त्यांना प्रशासन चावलता येत, ना राज्य सरकार म्हणून. भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. याचं कारण असं, ज्या प्रमाणे भाजपच्या उत्तर प्रदेश सरकारने गंगेमध्ये जिथे कुंभमेळा केला. ज्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सगळी पापं धुतली जातात अशी एक धारणा आहे. त्या गंगेमध्ये यांनी तिथे मृत्यूमुखी पडलेल्या करोनग्रस्तांची जी मृतदेह होती ती सोडून दिली होती. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. तुम्ही पहिले हे जाहीर करा, एक तर पंतप्रधान मदत निधी जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे. मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. मुख्यमंत्री निधीतनं तेव्हा कोविड केअर सेंटर्स ही महाराष्ट्रात उभारली गेली, ती कशी उभारली गेली? लसीकरण केंद्र ही एक ते दोन होती ती सहाशेच्या वरती आम्ही केली. रुग्णांचे बेड वाढवले, ऑक्सिजनचे प्लांट टाकले हे सगळं त्या वेळेला आम्ही केलं. पण त्याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती. हे त्यांनी विसरता कामा नये. पंतप्रधानांनी रिकाम्या थाळ्या बडवायला सांगितल्या होत्या, त्यावेळा आम्ही जनतेला पाच रुपयांत शिवभोजन दिलं होतं. हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये. आणि पंतप्रधान मदत निधी जो आहे, त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही. त्याच्यात लाखो करोडो रुपये आहेत. तुम्ही पैसा कुठून आणायचा? हा प्रश्न विचारता म्हणून मी त्यांना विचारलं की, पीएम केअर फंड जो काय फंड आहे त्यातून आता पंतप्रधान येताहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50 हजार कोटी रुपये जाहीर केले तर, महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं. नाही तर मग पीएम कोणाची केअर घेताहेत? पीएम केअर म्हणजे कोणाची केअर? आताच ती द्या, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. करोना काळातलं उणं-दुणं काढायचं असेल माझी तयारी आहे. तुम्ही काय केलं? आम्ही काय केलं? याच्यावरती चर्चा होऊ शकते. पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटा फोडायची ही मुख्यमंत्र्यांची जी काय सवय आहे त्या सापळ्यात मी अडकणार नाही. आता पहिले माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. आणि त्याला हेक्टरी 50 हजार रुपये मदत करा, असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
Comments are closed.