Latur Rain News – देवणी तालुक्यात पावसाचा कहर; वलांडी मंडळात अतिवृष्टी, देवनदी काठचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पाण्याखाली

सलग तिसऱ्यांदा मांजरा नदीच्या पूराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. वरुन आभाळ फाटले अन् नदीचे पाणी शेतशिवारासह गावागावात शिरल्याने “पाणीच पाणी चोहीकडे, शेतशिवार गेला कोणीकडे?”, असे विदारक चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. सतत पडणारा पाऊस, नदीला आलेला पूर व शेतशिवारात तुंबलेले पाणी पहाताना शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला आहे.

मुसळधार पावसाने कहरच केला असून अख्खा शिवार पाण्यात बुडाला आहे. काय शोधावे, कुठे शोधावे या विदारक परिस्थितीने शेतकऱ्यांच्या मनात काहूर माजवले आहे. नदीकाठच्या गावात नासाडी झालेल्या पिकांची दुर्गंधी, जनावरांचा चारा वाहून नासून जातोय, दारात भिजत असलेली जनावरे टाहो फोडतानाचा आवाज, काळजात चर्रर्र करत आहे. दसरा दिवाळी सण तोंडावर असताना हे सण उत्सव साजरे करण्याचे पाहिलेले स्वप्न पाण्यात वाहिले आहे. तालुक्यात गेल्या पाच दशकात असा पाऊस व परिस्थिती कधीच पाहिली नाही, असे सांगताना वयोवृद्धांचा कंठ दाटून आला. सततच्या मुसळधार पावसामुळे शनिवारी (27 सप्टेंबर 2025) देवनदीला पूर आला असून या पुरामध्ये नदीकाठचे विठ्ठल रुक्मिणी व महादेव मंदिर आणि पुंडलिकाचे मंदिर पूर्णतः पाण्यात बुडाले आहे. तसेच नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी घुसले आहे.

देवणी तालुक्यात शुक्रवारी (२६ सप्टेंबर २०२५) रात्रभर पावसाच्या मुक्कामानंतर शनिवारी सकाळी अर्ध्या तासापासून मोठ्या पावसाला सुरुवात झाली होती. शासनाच्या दप्तरी वलांडी मंडळांत सर्वाधिक ९१ मि.मी पावसाची नोंद झाली तर, देवणी मंडळात ५९ तर बोरोळ मंडळात ५३ मि.मी पावसाची नोंद झाली. तसेच तालुक्यातील सरासरी ६७.६६ मि.मी पावसाची नोंद झाल्याने ढगफुटी झाली आहे. वलांडी मंडळात पावसाचा हाहाकार माजला आहे. पावसामुळे तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. खरीप हंगाम विशेषत: तालुक्याची अर्थ वाहिनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. जवळपास २६ हजार हेक्टर वरील उभे पीक पूर्णता जलमय झाले आहे. तसेच तुर पीक पण नष्ट होत आहे. यामुळे शेतकऱ्याचे जवळपास कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणारे आहे.

तालुक्यातील उदगीर निलंगा राज्यमार्गावरील धनेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. हेळंब-गिरकचाळ-लातूर, जवळगा-साकोळ, शिवाजीनगर ते बोरोळ, बोरोळ-सिधिंकामट हे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सोमनाथ वाडकर व पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड यांनी नागरिकांना सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.

Comments are closed.