पाकची पुन्हा जिरवली! अंतिम सामन्यापूर्वी कर्णधारांच्या फोटोशूटला टीम इंडियाचा नकार
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार असताना तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय संघाने पारंपरिक ट्रॉफी फोटोशूटला बहिष्कार घालत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. याआधीही कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघा यांनी नाणेफेकीवेळी हस्तांदोलन टाळले होते. भारतीय खेळाडूंनीही पाकिस्तानी संघाशी कोणताही संवाद साधण्यास नकार दिला होता. या साऱ्या घडामोडींमुळे रविवारी होणारा फाइनल हायव्होल्टेज ठरण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अक्रम यांनी अंतिम सामन्यासाठी भारताला दावेदार मानले आहे. त्यांनी सांगितले, “हा भारत-पाकिस्तान सामना आहे. भारत जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे, पण या फॉरमॅटमध्ये काहीही होऊ शकतं. एक चांगली खेळी किंवा एक प्रभावी गोलंदाजी स्पेल सामन्याचा प्रवाह बदलू शकतो.”
अक्रम यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये शुभमन गिल आणि अभिषेक शर्माचे विकेट घेतले, तर भारताचा मध्यक्रम दबावाखाली येऊ शकतो. त्यांनी पाकिस्तानला आत्मविश्वास आणि लय कायम ठेवत शहाणपणाने खेळण्याचा सल्ला दिला.
फायनल सामन्याच्या अनुषंगाने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, तिकीटांसाठी प्रचंड मागणी आहे. स्टेडियममध्ये दोन्ही देशांच्या चाहत्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळणार असून, अनेकांनी हा सामना ‘लघु विश्वचषक’ ठरणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान आमनेसामने येत असून, क्रिकेटप्रेमी श्वास रोखून या महायुद्धाची प्रतीक्षा करत आहेत. भारताने लीग टप्यातील सर्व सामने जिंकून ही फेरी गाठली आहे. तर पाकिस्तानने केवळ 4 सामने जिंकले आहेत.
Comments are closed.