चाचणी – देशद्रोही
>> श्रीकांत आंब्रे
आपल्या कथा, कादंबऱया, राजकीय विडंबन गीतं-वात्रटिका यातून कुणाचीही भीडभाड न ठेवता राजकारण्यांची पोलखोल करणारे साहित्यिक म्हणजे डॉ. महेश केळुसकर अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांची स्वतःची एक उपरोधिक, तिरकस शैली आहे. राजकारणाची आणि प्रत्येक नव्या-जुन्या राजकीय नेत्यांच्या स्वभावविशेषांची नेमकी जाण असल्यामुळे दंभावर आणि व्यंगावर बसणारे त्यांच्या लेखणीचे तडाखे इतके जबरदस्त असतात की, वाचकाला आपल्या मनातील खदखदच त्यातून व्यक्त होताना दिसते. अलीकडेच प्रकाशित झालेली ‘जय भवानी जय मराठी’ ही त्यांची तिसरी राजकीय कादंबरीही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्ताबदलाच्या थरारक नाटय़ावर ही कादंबरी आधारित आहे.
सत्ताबदलाच्या सात दिवस आधी सत्ताधारी पक्षाच्या चाळीस आमदारांसह काही मंत्र्यांनी परराज्यात जाउढन केलेल्या बंडाची पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. सगळी राजकीय नीतिमूल्ये, नियम, प्रथा-परंपरा, संकेत, औचित्य पायदळी तुडवून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारा विचित्र अध्याय परराज्यात सूडभावनेने लिहिला जात होता. राजकीय विसंगती आणि त्यातील हिडीस वृत्ती टिपणाऱया डॉ. महेश केळुसकर यांच्या लेखणीतून हा दोन पक्षांचा तमाशा सुटणं शक्यच नव्हतं. हे आव्हान समर्थपणे पेलून राजकीय कादंबरीच्या प्रांगणात कल्पकतेने आपल्या वेगळेपणाचा ठसा या कादंबरीच्या रूपाने त्यांनी उमटवला आहे.
कादंबरीत मूळ ठिकाणे, पक्ष, नेते, नावे, काही घटना प्रसंग अर्थातच बदलेले आहेत. कादंबरीच्या नावातील घोषणेपासून या बदलाची सुरुवात लक्षात येते. तत्कालीन मुख्यमंत्री अवंती गडकरी ही चक्क स्त्री व्यक्तिरेखा दाखवल्यामुळे या कल्पनारम्य कथानकाला वेगळीच रंगत येते. यातील भैरवनाथ म्हणजे कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. देशभक्त पक्षाचे भूतपूर्व मुख्यमंत्री श्रीराम खरे, त्या पक्षाचे दिल्लीतील मंत्री मोटाभाई यांच्याबाबतही तेच आहे. भैरवनाथांचा आज्ञाधारक टॅक्सी ड्रायव्हर बाबल गावडे, देहाचा वापर करून आपल्या न्यूज चॅनलसाठी एक्स्क्ल्युसिव्ह बातम्या मिळवणारी बोल्ड पत्रकार रीटा गुप्ता, विधान परिषदेतील आमदारकी मिळवण्याची स्वप्न पाहणारा राजू भोईर, शेवटपर्यंत आपल्या आत्मविश्वासावर ठाम असलेल्या आणि शेवटी फासे उलटे पडल्यावर हतबल झालेल्या मुख्यमंत्री अवंती गडकरी ही पात्रं कायम लक्षात राहणारी आहेत.
राजकीय स्वार्थासाठी खाल्ल्या घरचे वासे मोजणारे बंडखोर, खोक्यांचा कथित व्यवहार, दारू पिऊन धिंगाणा घालणाऱया आमदारांची बेहोशी, आमदार व मंत्री फोडण्यासाठी लावलेल्या सेटिंग्ज, फोनाफोनी, आमदारांची पळवापळवी, बाईट मिळवण्यासाठी न्यूज चॅनलवाल्यांची चाललेली धडपड, खुलासे-प्रतिखुलासे, पत्रकार परिषदा, सडकछाप भाषेतून शिव्या देत एकमेकांचा उद्धार करणारे नेते यातून या सत्तानाटय़ातील हपापलेपणा आणि संघर्षाची धार अधिक तीव्र होत जाते. हे सगळं इतक्या स्वाभाविकपणे घडत असल्याचं दाखवलं आहे की, त्यासाठी लेखकाच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटेल. एका बोल्ड प्रसंगासह चित्रमय शैलीतील हे प्रसंग रेखाटताना लेखक हातचं काही राखून ठेवत नाही, इतका बिनधास्तपणा त्यांच्या लिखाणात आहे. विश्वासघातकी राजकारण सिनेमॅटिक स्टाइलने रंगवण्यात ते यशस्वी झाले आहेत. खरे तर ही ‘वो सात दिन’ची मूळ आणि खरी स्टोरी वाचकांना माहीत असूनही तिचं कल्पनारम्य कादंबरी रूप त्यांना खिळवून ठेवणारं आहे.
मराठी राजकीय कादंबरीच्या क्षेत्रात 1970 च्या दशकात अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन लक्षणीय कादंबऱयांनंतर डॉ. महेश केळुसकर यांना आपल्या मनात भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्ध साठलेल्या उद्रेकाला मोकळी वाट करून देण्यासाठी विस्ताराने मोठा असलेला कादंबरी हाच फॉर्म जवळचा वाटला. त्यातून ‘यू पान आल्सो विन’ व ‘क्रमशः’ या त्यांच्या दोन राजकीय कादंबऱया प्रकाशित झाल्या. आताची ही तिसरी कादंबरीही त्याच पठडीतील असून वाचकांना आकर्षून घेण्याची ताकद तिच्यात निश्चित आहे.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)
जय भवानी जय मराठी (कादंबरी))
लेखक: डा. महेश केळुसकर
प्रकाशक डिंपल पब्लिकेशन
पृष्ठे ः 154, किंमत: आरएस 300/-
Comments are closed.