आरोग्य – त्वचारोगाशी सामना

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

आजकाल ओपीडीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक त्वचेचे रुग्ण दिसू लागलेत. हे एवढे प्रमाण का वाढतेय त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. महत्त्वाची काही कारणे विचारात घेतली तर त्यामध्ये मुख्य कारण आहार हेच आहे. त्वचा आरोग्याचा आरसा आहे.

मनुष्याचे तेज हे त्वचेवरून लक्षात येते. भले ती काळी असो, गोरी असो अथवा गहूवर्णी असो. ती तजेलदार निरोगी दिसणं हे महत्त्वाचं. सध्या मात्र त्वचा विकार असणारे रुग्ण दिसू लागलेत. हे एवढे प्रमाण का वाढतेय त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. महत्त्वाची काही कारणे विचारात घेतली तर त्यामध्ये मुख्य कारण आहार हेच आहे. त्वचा मूळ असते तशीच राहते. साबण क्रीमच्या कंपन्यांनी कितीही बाजारीकरण केलं तरीही बाहेरील मलमपट्टीने त्वचा सुधारत नाही. त्याला आपला आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक आरोग्य हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

रुग्ण तपासताना कुठल्याही रोगांची बाहेरून लक्षणे दिसतात ती त्वचेवरूनच. त्वचा म्हणजे आपले एक ज्ञानेंद्रिय. त्यातून स्पर्श या ज्ञानाची जाणीव आपल्या मेंदूला होते. त्या स्पर्शाच्या अनेक जातकुळी आहेत. थंड, गरम असा उष्णतेचा अनुभव, खरखरीत मुलायम असा स्पर्शाचा अनुभव, मोरपीस फिरवल्यावर हवाहवासा वाटणारा हळुवार स्पर्श तर डासांमुळे होणारी वेदनायुक्त टोचणी असे अनेक विविध परिस्थितीजन्य ज्ञानाची जाणीव मेंदूला होते ती त्वचेमुळे. त्वचा ही संपूर्ण शरीराचे आतून बाहेरून आवरण आहे. बाहेरून स्वेद ग्रंथीमुळे ती ओलसर राहते आणि आतील त्वचा श्लेष्मामुळे ओली राहते. त्वचा हे वायू या महाभूताचे प्रधान तत्त्व असणारे ज्ञानेंद्रिय आहे. त्याचबरोबर त्वचेचा रंग हा भ्राजक पित्तामुळे दिसतो. तसंच त्वचेचा संबंध आपल्या शरीरातील सप्तधातूंपैकी मांसधातूशी निगडित आहे आणि त्याचबरोबर प्रामुख्याने रस, रक्त, शुक्र आणि स्वेद यांच्याशी संबंधित आहे.

सुश्रुत संहितानुसार आयुर्वेदात त्वचेचे सात प्रकार सांगितले आहेत. त्याप्रमाणे रोगांची उत्पत्ती होत असते. उदाहरणार्थ अभासीनी या अतिशय वरच्या भागातील त्वचेमध्ये शिबसारखे पांढऱया डागांचे विकार होतात ते लवकर बरेही होतात, परंतु वेदिनी, रोहिणी किंवा मांस धरा असा अतिशय खोलवर असणाऱया त्वचेत अर्बूद विद्रधीसारखे व्याधी कष्टसाध्य असतात. अधिक खोलात जाण्यापेक्षा ते होऊ नये म्हणून काय उपाययोजना करावी हे पाहू.

चेहऱयाचे मुरुम हे आजच्या पिढीमध्ये फार आढळून येते. अतिरिक्त वजन वाढलेले, अतिशय तेलकट-तुपकट पदार्थ खाणे (उदाहरणार्थö पिझ्झा, बर्ग, वडा इत्यादी), व्यायामाचा अभाव, एक जागी बसून राहण्याची जीवनशैली आणि प्रचंड मानसिक तणाव या कारणांमुळे मुरमांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कुमारावस्थेतील मुलींना हमखास पीसीओएससारखे त्रास मुरुमांबरोबर होताना दिसतात. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आहार, जीवनशैली बदल करणे, वमन शिरावेध, रक्तमोक्षण, स्नेहन स्वेदन, रक्तशुद्धीकर काढे इत्यादीसारख्या चिकित्सा करून कायमस्वरूपी इलाज करता येतील.

शीतपित्त – हा त्वचेचा रोगही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपल्या नकळत आपण अनेक पदार्थांमधून प्रिझर्व्हेटिव्हसारखे कितीतरी केमिकल्स खात असतो हे आपल्याला माहीत नाही. पण अशा अन्नपदार्थांमुळे असेल किंवा इतर औषधे कीटकनाशके यांच्या एलर्जीमुळे असेल हात, पोट, मांडय़ा यांच्यावरती मोठमोठय़ा गांधी येऊन खाज येते हे लक्षण शीतपित्तामध्ये दिसून येते.

अजून एक त्वचारोग अधिकाधिक वाढत चालला आहे तो म्हणजे बुरशीजन्य क्षुद्र कुष्ठ. त्याला इंग्रजीमध्ये टिनिया क्रूरीस असेही म्हणतात. जांघेतील भाग, काखा, पोटाची वळी जिथे जिथे घाम साठतो तिथेच अत्यंत खाज येते. त्या जागी खाजवून अक्षरश रक्त काढावे अशी असह्य खाज येते असे रुग्ण सांगतात. या रोगावर खूप दिवस इमानेइतबारे योग्य उपचार करणे गरजेचे आहे. कपडे धुवायचा साबण हा याबाबतीत एक मोठा शत्रू म्हणून काम करतो. होजिअरी मटेरियलच्या कपडय़ात अंडरवेअर गारमेंटमध्ये साबणातील घाम काढून टाकण्यासाठी असणारी एंजाइमसारखी केमिकल्स कितीही धुतली तरी तशी चिकटून राहतात आणि तेच अंडरगारमेंट्स दिवसभर घालून ठेवल्यामुळे जांघेतील कातडीची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. तसेच जेवणामध्ये अतिरिक्त मीठ असणे हेही याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

आपल्या देशात मेडिकल स्टोअर्सना कुठलेही औषध डॉक्टरांच्या प्रिक्रीप्शनशिवाय विकण्याची एक मूक संमती आहे. त्यामुळे चार चार औषधे एकत्र करून त्या स्टेरॉईड मिसळलेली मलमे या खाजेसाठी वापरणारे अनेक महाभाग आहेत. या मलमांमुळे शेतीला जसं खत मिळतं तसं या बुरशीला खत मिळाल्यासारखे वाढते आणि हा रोग भयानक होतो. त्यामुळे अगदी निरुपद्रवी वाटणारे हे रोग भयानक रूप धारण करू नयेत असे वाटत असेल तर योग्य तज्ञांचा सल्ला घेऊनच मलम आणि इतर औषधे वापरा.

Comments are closed.