कृषिमंत्री भरणे म्हणतात, पंचनाम्यांचा अहवाल आल्याशिवाय काही नाही!

‘पंचनामे झाल्याशिवाय आणि त्यांचा अहवाल आल्याशिवाय काही करता येणार नाही,’ असे सांगत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, आज कृषिमंत्र्यांनी ‘अहवाल आल्याशिवाय काही करता येणार नाही,’ असे सांगितल्यामुळे मदतीबाबत सरकारच गोंधळात असल्याचे दिसून आले.
कृषिमंत्री भरणे आज माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी एकरी 50 हजार रुपयांच्या मदतीबाबत काहीच भाष्य केले नाही. दिवाळीपूर्वीच मदत केली जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आमदार अभिजित पाटील, नगराध्यक्षा मीनल साठे, दादासाहेब साठे, उमेश पाटील, आदी उपस्थित होते.
अवघ्या काही मिनिटांत उरकला दौरा
कृषिमंत्री भरणे यांचा पूरग्रस्त पाहणीचा प्रस्तावित दौरा रद्द होता होता कसातरी पार पडला. अवघ्या काही मिनिटांत त्यांनी उंदरगाव नदीक्षेत्रात पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड असंतोषाला-उद्रेकला सामोरे जावे लागले.
Comments are closed.