युएईमधून सर्वाधिक हवे असलेले 'पिंडी'

बब्बर खालसा’चा दहशतवादी : बॉम्ब हल्ल्यांसह अनेक गुन्हे दाखल

वृत्तसंस्था/ चंदीगड

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा दहशतवादी परमिंदर सिंग उर्फ पिंडी याचे संयुक्त अरब अमिरातीतून (युएई) भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. एका मोठ्या कारवाईत पंजाब पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी ही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केली. पिंडी हा परदेशातील दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा आणि हॅपी पासियाचा जवळचा सहकारी आहे. तो बटाला-गुरदासपूर परिसरात पेट्रोल बॉम्ब हल्ले, हिंसक हल्ले आणि खंडणी यासारख्या अनेक गंभीर गुह्यांमध्ये सहभागी आहे. पंजाब पोलीस डीजीपींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्यार्पणासंबंधीची माहिती दिली.

एका मोठ्या प्रक्रियेनंतर पंजाब पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने बब्बर खालसा इंटरनॅशनलचा दहशतवादी परमिंदर सिंग पिंडीला अबू धाबी (यूएई) येथून भारतात परत आणल्याची माहिती पंजाबच्या डीजीपींनी दिली आहे. परमिंदर सिंग उर्फ पिंडी याच्यावर भारतात बॉम्ब हल्ले, खंडणी आणि हिंसक घटनांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बटाला पोलिसांनी त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. नोटीस जारी केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिक्रायांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. 24 सप्टेंबर रोजी हे पथक युएईला रवाना झाले होते. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आरोपीला यशस्वीरित्या भारतात परत आणण्यात आले.

Comments are closed.