प्रस्ताव कसले मागता, पीएम केअर निधीतून शेतकऱ्यांना 50 हजार कोटी द्या! उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले

अस्मानी संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागल्याचे विदारक चित्र स्पष्ट दिसत असताना नुकसानीच्या अहवालाचे प्रस्ताव कसले मागता, असा सवाल करीत ‘पीएम केअर’ निधीतून महाराष्ट्राला 50 हजार कोटींची मदत तातडीने करा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला ठणकावले. शिवाय साखर कारखान्यांच्या कर्जाची थकहमी घेऊन जसे पॅकेज देता, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या बँकांच्या नोटिसा थांबवा, बळीराजाला सरसकट कर्जमुक्त करा आणि हेक्टरी 50 हजारांची तातडीची मदत द्या, असेही ते म्हणाले.

सरकारने प्रतिहेक्टरी जाहीर केलेली सात हजारांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. शेतकऱ्याला जमीन कसदार बनवायलाच एकरी सात हजारांचा खर्च येईल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजारांची तातडीची मदत करावी.

सरकार म्हणते, दोन-तीन वर्षांत 14 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली. मात्र ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. शेतकऱ्यांना अजूनही 2017 च्या कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवलीय का? दिलेली मदत गेली तरी कुठे?

मराठवाडय़ातील पूरस्थिती, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझ्यासोबत संजय राऊत, अंबादास दानवे, ओमराजे, पैलास पाटील, शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह मी मराठवाडय़ाची भेट घेतल्याचे ते म्हणाले. आजपर्यंत अस्मानी संकट, आपत्ती आलेली नाही, असे नाही, परंतु यावेळची आपत्ती ही भयानक आणि भीषण आहे. जणूकाही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी ही परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. अस्मानी संकट आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी दयावान पंतप्रधान मोदींनी प्रस्ताव देण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. कसला प्रस्ताव? डोळ्यांसमोर इतकी भीषण स्थिती असताना प्रस्ताव कसले मागता, पीए केअर निधीतून 50 हजार कोटींची मदत द्या, असे ते म्हणाले. नाहीतर ‘पीएम केअर’ म्हणजे नेमकी कुणाची केअर, असा टोलाही त्यांनी लगावला.

अस्मानी संकटामुळे केवळ शेतकऱ्यांचाच नाही तर आपल्याही तोंडचा घास हिरावला गेला आहे. हे संकट इतके भीषण आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरवडून गेल्या आहेत. त्या पुन्हा पेरणीयोग्य व्हायला 3 ते 5 वर्षे लागतली. यातच डोक्यावर कर्ज असताना घरंदारं वाहून गेलीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेलेय. तसं पाहिलं तर शेतकऱ्यांचे अख्खं आयुष्यच वाहून गेलंय!

सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडा

विधानसभा निवडणूक होण्याआधी शेतकऱ्याच्या हातात पीक होते. मात्र सरकार हमीभाव देत नसल्याने असंतोष होता. तर आता पीकही नाही. त्यामुळे तुम्ही जशी आम्हाला कर्जमाफी दिली, त्याचप्रमाणे सरकारने तातडीने कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडा, असे शेतकरी धाय मोकलून सांगत होते, असेही त्यांनी सांगितले.

…मग हे राजकारणच समजा!

अस्मानी संकटामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने मदत नेमकी कधी आणि किती करणार, असे विचारल्यावर त्याच्या मागे पोलीस लावण्यात आले. ही कुठली लोकशाही? कुठले सरकार? कशासाठी तुम्ही राज्य करताय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री म्हणतात यात आम्हाला राजकारण आणायचं नाही, पण शेतकऱ्याला मदत मिळवून द्या, न्याय द्या असं बोलणं राजकारण असेल त्याला तुम्ही जरूर राजकारण समजा, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भाजपला सरकार चालवता येत नाही

शेतकरी कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं. अगदी बायकोचं मगळसुत्रं. त्यामुळे मंगळसुत्रावरून राजकारण करणाऱ्या भाजप सरकारला शेतकऱ्याच्या मंगळसुत्राची किंमत किती आहे, हे कळेल, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोविडच्या काळातही आम्ही शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली होती. मात्र या सरकारची स्थिती पाहता मला आता एका गोष्टीवरती गाढ विश्वास बसलेला आहे की भाजपला सरकार चालवता येत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. पंतप्रधान मोदी परवा महाराष्ट्रात येत आहेत. त्यांनी पीएम केअर फंडातून 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी, ज्यामुळे महाराष्ट्रावरील संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

डबल इंजिन ‘डबडय़ा’ची मदत घ्यावी

पंजाबमध्ये हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत कालबदद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. याला म्हणतात सरकार. तसेच पंजाबमध्ये पंजाबमध्ये 1600 आणि हिमाचल प्रदेशला 1500 कोटींची मदत पंतप्रधानांनी केली आहे. मात्र महाराष्ट्राला अशी मदत मिळाली नाही. त्यामुळे डबडं लागलेल्या डबल इंजिन सरकारने धूर सोडणाऱ्या इंजिनाची मदत घेऊन शेतकऱ्याला मदत करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे कुचकामी सरकार..?

बिहारमध्ये निवडणुका असल्याने पंतप्रधानांनी 75 लाख महिलांच्या खात्यात दहा हजारांचा जमा केले. मतचोरी पकडल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी करायला निघालात का? बिहारच्या मदतीमुळे आम्हाला पोटदुखी नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून मतदान केले ते महाराष्ट्र संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट कसली बघता, चर्चा कसल्या करता, समोर जे घडलेय ते दिसत नाही का, असा सवाल करीत हे कुचकामी सरकार असल्याची टीका केली.

शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार

शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झाला आहे. तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी एखाद दोन तास चिखलामध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, असेही ते म्हणाले. जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कलाच दसरा मेळावा घेणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही सहकार्य करतो…

विरोधी पक्षनेता न देणं हा सत्ताधारी पक्षाचा भित्रेपणा, घाबरटपणा आणि भेकडपणा आहे. कोरोना काळातील कामाबद्दल चर्चा करायला आम्ही तयार आहोत. मात्र फडणवीस अंगलट आल्यावर फाटे पह्डतात, असा टोलाही त्यांनी लगावला. मी तर असं म्हणतो की, महाराष्ट्रावरती हे जे संकट आलेलं आहे त्याच्यावरती आम्ही राजकारण बाजूला ठेवायला तयार आहोत. आम्ही तुमच्या बरोबर येतो. तुम्ही विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा. त्याच्यामध्ये चर्चा करू आणि सर्वानुमते महाराष्ट्राला कशी मदत करायची हे ठरवू. सगळे मिळून पेंद्र सरकारकडे जाऊ आणि महाराष्ट्राला मदत करू. विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, असेही ते म्हणाले. मात्र तुम्ही जबाबदारी झटकू नका, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घाला

हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामना उद्या पुन्हा होत आहे. त्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आपल्या देशात अतिरेकी घुसवत आहेत, त्यांच्याबरोबर हे क्रिकेट खेळताहेत. हे देशभक्तीचे ढोंग आहे. दोन सामने झाले. दुसरा सामना कधी झाला ते समजले नाही, पण उद्या तिसरा सामना होत आहे. निर्लज्जपणाचा कळस आहे. हिंदुस्थानी सैन्यासाठी सोलारचे तंबू बांधून देणारे सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली जाते. हे कसे सहन करणार? म्हणूनच मी सर्वांना आवाहन करीत आहे की, देशभक्तांनी उद्याच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा. प्रायोजकांनी देशाच्या शत्रूबरोबरच्या सामन्यांसाठी प्रायोजकत्व देऊ नका, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

Comments are closed.