गायीचे आयुष्य वाचले …
मुक्या प्राण्यांसंबंधी आस्था आणि माया असणे, हे मानवतेचे लक्षण आहे. भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका विदेशी नागरीकाने या संदर्भात आदर्शाचा एक वस्तुपाठ नुकताच घालून दिला आहे. या पर्यटकाचे नाव डंकन मॅकनॉट असे आहे. भारतात गायीचे महत्व मोठे आहे. हिंदूंच्या दृष्टीने गाय प्राणी नसून तिला देवतेचे स्थान आहे. हा पर्यटक भारतात आल्यानंतर त्याला एका निर्मनुष्य वनप्रदेशात एक गाय एका सुक्या नाल्यात अडकलेली दिसून आली. प्रयत्न करुनही त्या गाईला नाल्यातून बाहेर पडता येत नव्हते. या विदेशी पर्यटकाने या गायीचा जीव वाचविण्याचा निर्धार केला आणि प्रयत्नांना प्रारंभ केला.
प्रथम त्याने एकट्यानेच या गाईला नाल्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, गाईचे वजन अधिक असल्याने तिला ओढून बाहेर काढणे त्याला एकट्याच्या जीवावर शक्य झाले नाही. आजूबाजूला कोणी माणसेही दिसत नव्हती. त्यामुळे साहाय्यासाठी कोणाला त्वरित बोलावणे शक्य झाले नाही. अशा स्थितीत त्याने एक युक्ती केली. त्याने एक व्हिडीओ संदेश आपल्या मोबाईलवरुन प्रसारित केला. ‘भारतात पवित्र मानली जाणारी गाय या नाल्यात अडकली आहे. ती जिवंत असून नाल्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि, तिला ते शक्य होत नाहीये. मी स्वत: प्रयत्न करत आहे. पण गायीचे वजन अधिक असल्याने मी एकट्याच्या बळावर हे करु शकत नाही, असे त्याने त्याच्या व्हिडीओ संदेशात स्पष्ट केले.
तो संदेश पाहून त्याला साहाय्य करण्यासाठी जवळच्या वस्तीतून एक तरुण पुढे आला. या दोघांनी बराच आटापिटा करुन अखेर या गाईला नाल्याच्या बाहेर काढले. अशा प्रकारे गाईचा जीव वाचला. हा विदेशी पर्यटक या गाईला साहाय्य न करता तसाच पुढे निघून गेला असता, किंवा एकट्याला गाईचा जीव वाचविणे शक्य नाही, हे समजल्यावर त्याने प्रयत्न सोडून दिले असते, तर कदाचित या गाईचा मृत्यू झाला असता. तथापि, त्याने सोशल मिडियावर या प्रसंगाचा व्हिडीओ प्रसारित करण्याचे प्रसंगावधान दाखविल्यामुळे या गाईचा जीव वाचला आहे.
Comments are closed.