रंग यात्रा – अथेन्सची शाळा
>> दुष्यंत पाटील
शतकानुशतकं प्रतिभावंत चित्रकारांनी काढलेली पेंटिंग्ज आजही पाहायला मिळतात. अशाच काही महान चित्रांची आणि चित्रकाराच्या विश्वाची सफर करणारे हे सदर.
पंधराव्या शतकात जन्मलेला पोप ज्युलिअस (दुसरा) हा इतिहासात `योद्धा पोप’ नावानं ओळखला जातो. हा पोप चिलखत परिधान करून चक्क रणांगणावर उतरायचा आणि सैन्याला लढण्याचे आदेश द्यायचा! एखाद्या सम्राटासारखं या पोपचं सामर्थ्य होतं. हा पोप महत्त्वाकांक्षी होता. या पोपची कारकीर्द सोळाव्या शतकाच्या सुरुवातीची.
या पोपला ख्रिस्ती धर्माचं केंद्र असणाऱया `व्हॅटिकन’ शहराचा कायापालट करायचा होता. डोळे दिपून जातील असं चर्च त्याला बांधायचं होतं. त्याला स्वत:च्या निवासस्थानाचाही (विशेषत त्यातलं ग्रंथालय) त्याला असाच बदल करायचा होता. चर्च असो वा त्याचं निवासस्थान, पाहताक्षणीच लोकांनी नकळत एका वेगळ्याच विश्वात जावं, असं त्याला वाटायचं. त्याच्या निवासस्थानी मोठमोठे विद्वान, राजकीय मंडळी त्याला भेटायला यायचे. मग त्यांच्यात बौद्धिक, राजकीय चर्चा व्हायच्या, करारही व्हायचे. या भेटी बहुतेकवेळा ग्रंथालयात व्हायच्या. त्यामुळे ग्रंथालय कुणावरही खोल छाप पाडणारं असावं, असं त्याला वाटायचं. त्याला ग्रंथालयाच्या चार भिंतीवर चार भव्य भित्तिचित्रं हवी होती. भिंतीवर नजर पडताच या चित्रांनी शब्दांशिवाय कथा सांगावी, अशी त्याची अपेक्षा होती. पण हे काम करायला कुणीतरी प्रतिभाशाली कलाकार हवा होता. पोप अशा प्रतिभाशाली कलाकाराच्या शोधात होता.
एके दिवशी पोपची ओळख अवघ्या पंचवीस वय असणाऱया राफेलशी झाली. भविष्यात विश्वविख्यात होणार असणाऱया राफेलची प्रतिभा पोपला लगेचच लक्षात आली. त्यानं ग्रंथालयातल्या भित्तीचित्रांचं काम राफेलला दिलं. राफेलला चार भिंतींवर चार चित्रांमधून तत्त्वज्ञान, काव्य, धर्मशास्त्र आणि न्याय असे चार विषय हाताळायचे होते. यापैकी `तत्त्वज्ञान` या विषयावर राफेलनं `दी स्कूल ऑफ अॅथेन्स’ नावाचं चित्र काढलं. हे चित्र अक्षरश: अजरामर झालं.
`दी स्कूल ऑफ अॅथेन्स’ या भित्तीचित्राचा आकार 16.5 फूट X 25 फूट इतका आहे! पाहताक्षणीच हे चित्र आपल्यावर भव्य आकारामुळे छाप टाकतं. राफेलनं या चित्रात प्राचीन ग्रीक वास्तुकलेचा प्रभाव असणाऱया एका भव्य हॉलमध्ये प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ दाखवले आहेत. वेगवेगळ्या विषयांमधले ज्ञानी तत्त्वज्ञ या चित्रात एकत्र दिसत असल्यानं चित्र पाहताना आपल्याला `ज्ञानमंदिर’ पाहत असल्याचा अनुभव येतो.
चित्रात अनेक ग्रीक तत्वज्ञ दिसत असले तरी मध्यभागी असणारे प्लेटो आणि अॅरिस्टॉटल आपलं लक्ष वेधतात. चित्रात डावीकडे उभा असणारा प्लेटो आकाशाकडे बोट दाखवतोय. त्याच्या हातात `टाइमीयस’ नावाचं पुस्तक आहे. प्लेटोच्या या पुस्तकात विश्वनिर्मिती, आत्मा, आदर्श यासारखे विषय हाताळलेले आहेत. आकाशाकडे बोट दाखवत प्लेटो आपल्या पुस्तकातल्या विषयावर बोलतोय असं वाटतं. याउलट चित्रात उजवीकडे उभा असणारा अॅरिस्टॉटल हात जमिनीकडे सरळ पुढे दाखवतोय. त्याच्या हातात त्याचं एथिक्स विषयावरचं पुस्तक आहे. या पुस्तकात त्यानं प्रत्यक्षातलं जीवन कसं जगावं, हे सांगितलंय. एकीकडे आकाशाकडे बोट दाखवत `आदर्श’ तत्त्वज्ञान सांगताना, दुसऱया बाजूला जमिनीच्या दिशेनं अॅरिस्टॉटल व्यावहारिक तत्त्वज्ञान सांगतोय.
चित्रात डाव्या बाजूला पोटिस दिसतोय. तो काही लोकांना प्रश्न विचारत असल्याचं चित्रात दाखवलंय. प्रत्यक्षात पोटिस त्याच्या काळात रस्त्यावरून जाताना, बाजारात असताना आजूबाजूच्या लोकांना प्रश्न विचारायचा. हे प्रश्न आपल्या जीवनातले मूलभूत प्रश्न असायचे. (उदा. ”धैर्य म्हणजे काय?”, ”न्याय म्हणजे काय?”, ”आनंद म्हणजे काय?” अशा स्वरूपाचे हे प्रश्न असायचे.) बरं, या लोकांनी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांनंतर पोटिस शांत बसायचा नाही. तो त्यांना असे काही प्रश्न विचारायचा की उत्तर देणारा प्रश्नात पडायचा किंवा गोंधळून जायचा. त्यामुळे उत्तर देणाऱयांना विचार करणं भाग पडायचं. अशा प्रश्नांसाठीच पोटिस प्रसिद्ध होता. हाच धागा पकडत राफेलनं चित्रात प्रश्न विचारणारा पोटिस दाखवलाय.
चित्रात गणितज्ञ पायथागोरस, युक्लिड, खगोलतज्ञ टॉलेमी यांच्यासह अनेक तत्वज्ञ येतात. या चित्राची खासियत म्हणजे चित्रातल्या लोकांच्या हावभावांनी चित्रात आलेला जिवंतपणा. चित्रातला प्रत्येक तत्वज्ञ काहीतरी शिकवताना, विचार मांडताना किंवा चर्चा करताना दिसतोय. म्हणूनच तर या चित्रात `ज्ञानाचं मंदिर’ दाखवलंय असं म्हणतात.
त्या काळात हे चित्र पोपला आवडलं होतंच. पण, आज पाचशे वर्षे होऊन गेली असली तरी या चित्राची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. आजही त्या वास्तूत गेल्यानंतर `दी स्कूल ऑफ अथेन्स’समोर लोकांची सतत गर्दी पाहायला मिळते!
[email protected]
Comments are closed.