शीतल देवीचा ‘सुवर्ण’ पराक्रम; जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत रचला इतिहास
हिंदुस्थानची १८ वर्षीय बिनहाताची धनुर्धर (तिरंदाज) शीतल देवी हिने शनिवारी झालेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ‘कंपाऊंड’ वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात शीतलने जागतिक क्रमवारीतील अव्वल असलेल्या तुर्कीच्या ओझनुर क्यूरे गिरदी हिला १४६-१४३ने पराभूत केले.
स्पर्धेत एकमेव बिनहाताची धनुर्धर असलेल्या शीतलने पाय आणि हनुवटीच्या मदतीने बाण सोडत हे ऐतिहासिक ‘सोनेरी’ यश संपादन केले. या स्पर्धेतील तिचे हे तिसरे पदक ठरले, हे विशेष! शीतलने याआधी तोमन कुमारसोबत कंपाऊंड मिश्र दुहेरीत ब्रिटनच्या ग्रिनहॅम व नॅथन मॅकक्वीन या जोडीचा १५२-१४९ असा पराभव करून कांस्यपदक पटकाविले होते. तसेच कंपाऊंड महिला खुल्या सांघिक स्पर्धेत शीतल आणि सरिता या जोडीला अंतिम लढतीत यजमान तुर्कीच्या जोडीकडून हार पत्करावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
शीतल-सरिता जोडीला रौप्य
शीतल व सरिता या हिंदुस्थानी जोडीनेही दमदार खेळ केला. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत यजमान तुर्कीच्या जोडीवर ३८-३७ अशी आघाडी घेतली. मात्र, निर्णायक टप्प्यात तुर्कीच्या खेळाडूंनी लढतीत पुनरागमन करीत गुणफलक ७६-७६ असा बरोबरी आणला. अखेरीस तुर्कीने १५२-१४८ अशी आघाडी घेत सुवर्णपदकावर मोहोर उमटविली. हिंदुस्थानी जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अंतिम झुंजीचा थरार
वैयक्तिक अंतिम सामना तणावपूर्ण झाला होता. पहिली फेरी २९-२९ अशी बरोबरीत संपली. मात्र, दुसऱ्या फेरीत शीतलने तीनही परिपूर्ण शॉट्स मारत (१०,१०,९) ३०-२७ अशी आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीत पुन्हा २९-२९ अशी बरोबरीत राहिली. चौथ्या फेरीत शीतलने २८ गुण मिळवले, त्यामुळे गिरदीने एका गुणाने आघाडी घेतली. तरीही शीतलकडे एकूण ११६-११४ अशी दोन गुणांची आघाडी कायम होती. अखेरच्या पाचव्या फेरीत शीतलने तिन्ही बाण १०च्या वर्तुळात मारून ३० गुणांची कमाई करीत आपले पहिले सुवर्णपदक निश्चित केले.
सबसॅम्पल्स सिडी कहानी
उपांत्य फेरीत जम्मू-कश्मीरच्या शीतलने ब्रिटनच्या जोडी ग्रीनहॅम हिला १४५-१४० अशा फरकाने पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हा सामना २०२३ ‘पिल्सन वर्ल्ड चॅम्पियनशिप’च्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती होती. त्यावेळी गिरदीने शीतलला १४०-१३८ अशा निसटत्या फरकाने हरवले होते. मात्र, यावेळी शीतलने सुवर्णपदकाच्या लढतीत अप्रतिम खेळ करत बाजी मारली अन् दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचे अखेर उट्टे काढले.
तोमन कुमारला सुवर्ण
हिंदुस्थानच्या तोमन कुमारने जागतिक पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत ‘कंपाऊंड’ पुरुष खुल्या गटात सुवर्णपदक जिंकले. त्याचा सहकारी राकेश कुमार याचे उपकरण बिघडल्याने त्याला सामना सोडावा लागला आणि विजेतेपद तोमनच्या नावावर नोंदले गेले. अंतिम लढतीत हिंदुस्थानातील दोन सर्वोत्तम पॅरा धनुर्धर भिडणार होते. मात्र, राकेशचा धनुष्य चार शॉट्सनंतरच बिघडल्याने त्याला स्पर्धा सोडावी लागली. त्यामुळे सुवर्णपदक तोमनकडे गेले. उपांत्य फेरीत तोमरने श्यामसुंदर स्वामीला १४४-१४३ने पराभूत केले होते, तर दुसरीकडे राकेशने ब्रिटनच्या नॅथन मॅकक्वीनवर १४७-१४३ने हरवीत अंतिम फेरी गाठली होती.
Comments are closed.