कॉंग्रेसचा स्वस्तपणाविरूद्ध कट रचला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओडीशात गंभीर आरोप

वृत्तसंस्था / भुवनेश्वर

केंद्र सरकारने नुकतीच वस्तू-सेवा करात मोठी कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या उपयोगाच्या अनेक वस्तूंचे दर बरेच कमी झाले आहेत. तथापि, जनतेला या दरकपातीचा लाभ मिळू नये, यासाठी काँग्रेसने काँग्रेसचे शासन असणाऱ्या राज्यांमध्ये नवे कर लावले आहेत. जनतेला स्वस्ताईचा लाभ नाकारण्यासाठी हा पक्ष अशी कारस्थाने करीत आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते ओडीशाच्या दौऱ्यावर असून झरसुगुडा येथील भाषणात त्यांनी हा आरोप केला. जनता काँग्रेसला क्षमा करणार नाही. काँग्रेसला तिच्या कर्माची फळे भोगावी लागतीलच, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

केंद्र सरकारने जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले. तेव्हा काँग्रेस शासित राज्यांनी त्यांच्यावर राज्याचा कर वाढविला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे शासन असलेल्या राज्यांच्या तुलनेत काँग्रेसचे शासन असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल यांचे दर अधिक आहेत. असाच प्रकार वस्तू-सेवा कराच्या संदर्भातही केला जात आहे. केंद्र सरकारने वस्तू-सेवा कर कमी केल्यानंतर आता काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये कर वाढविण्याची तयारी केले आहे. जनतेने काँग्रेसचा हा डाव ओळखण्याची आवश्यकता आहे, अशा अर्थाची टिप्पणी त्यांनी केली.

काँग्रेस काळात कर अधिक

2014 पूर्वी, म्हणजेच काँग्रेसच्या शासन काळात सर्वसामान्य जनतेवर करांचे प्रचंड ओझे टाकण्यात आले होते. काँग्रेसने त्यावेळी जनतेची लूट करण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्यामुळेच जनतेने भारतीय जनता पक्षाला बहुमताची सत्ता दिली. आम्ही सत्तेवर आल्यानंतर जनतेची या लुटीपासून सुटका करण्यासाठी निश्चित स्वरुपाच्या योजना सादर केल्या. वस्तू-सेवा कर कमी करणे, हा या योजनांचाच एक भाग आहे, असे प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Comments are closed.