सूर्यकुमारच्या पावलावर पाऊल; नेपाळच्या कर्णधारानेही पुरस्कार अर्पण केला शहीदांना

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून नेपाळ क्रिकेट संघाने इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने वेस्ट इंडिजसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना चार वेळा विश्वचषक विजेता संघ फक्त 129 धावांच करु शकला. नेपाळने हा सामना 19 धावांनी जिंकला आणि त्यांच्या क्रिकेट इतिहासात कसोटी खेळणाऱ्या देशाविरुद्धचा त्यांचा पहिला विजय ठरला. 38 धावांची शानदार खेळी करणाऱ्या कर्णधार रोहित पौडेलला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवप्रमाणेच रोहितनेही हा पुरस्कार आपल्या देशाच्या शहीदांना समर्पित केला.

सामन्यानंतर रोहित पौडेल म्हणाला, “खूप छान वाटतंय. कसोटी खेळणाऱ्या देशाला हरवण्यासाठी खूप वेळ लागतो, विशेषतः आम्ही युएईमध्ये आयोजित केलेल्या मालिकेत. येथे धावसंख्या 150-160 होती आणि मागील मालिकांकडे पाहता, संघ 150-160 धावा करून जिंकत होते. आम्ही आमचे 80-90 टक्के कौशल्य दाखवले. आज फिरकीपटू उत्कृष्ट होते.”

तो पुढे म्हणाला, “मी हा पुरस्कार आमच्या देशातील निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या शहीदांना समर्पित करू इच्छितो. गेल्या महिन्यात आमच्यासाठी कठीण काळ होता, म्हणून जर आम्ही नेपाळच्या लोकांना थोडा आनंद देऊ शकलो तर ते खूप छान होईल असे मला वाटते. ही फक्त सुरुवात आहे, अजून बरेच काही येणार आहे. आमचा विचार अगदी स्पष्ट होता: जर आम्ही इथे येत आहोत तर ती मालिका जिंकण्यासाठी आहे. आम्ही अजूनही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही योग्य प्रक्रियेचे अनुसरण करू आणि पुढे काय होते ते पाहू.”

सूर्यकुमार यादवने आशिया कप 2025च्या गट टप्प्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आणि तो विजय सशस्त्र दलांना समर्पित केला. या विधानासाठी त्याला त्याच्या सामन्याच्या शुल्काच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आल्याचे वृत्त आहे.

Comments are closed.