ऐकावे जनांचे… – वायफळ नसलेला व्हायफळ

>> अक्षय मोटेसगावकर

आज अनेकविध माध्यमांतून आपल्याला माहिती उपलब्ध होते. यातीलच एक पॉडकास्ट. विविध क्षेत्रातील तज्ञ, वक्ते यांच्याशी बातचित करत विविध विषय या व्यासपीठावर उलगडले जातात. त्यातून काय निवडावे, काय ऐकावे हे सांगणारे सदर.

एमबीएला शिकत असताना आम्हाला ब्रँड पोझिशनिंग करताना तुम्ही ठेवलेले तुमच्या कंपनीचे, प्रॉडक्टचे वेगळे नाव कसे ब्रँडला उद्देशीत बाजारपेठेच्या आणि ग्राहकांच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण करण्यासाठी मदत करते हे सोदाहरण शिकवले होते. वेगळ्या नावाचा फायदा हा असतो की, कुतूहलापोटी ते वाचणाऱयाच्या लक्षात सहज राहते. असेच एकदम वेगळे वाटणारे मराठी पॉडकास्टच्या यादीतले अनोखे नाव म्हणजे व्हायफळ (फळाची चिंता कशाला?). वायफळ या शब्दाच्या जवळ जाणारा हा शब्द. एखादी व्यक्ती अर्थहीन बडबड करत असेल तर “अरे काय वायफळ बडबड करतो आहेस” असं सहजपणे म्हटलं जातं, पण यूटय़ूबवरचा सुयोग रिसबूड आणि त्याची बायको प्राची यांचा व्हायफळ या नावाचा पॉडकास्ट अजिबातच वायफळ नाहीये. या गप्पा इतक्या सहज सुलभ आणि अभिनिवेशरहित आहेत की, तो पॉडकास्ट एक तासाचा किंवा थोडा मोठा असला तरी अजिबात कंटाळवाणा होत नाही, किंबहुना तो त्या गप्पांच्या प्रवाहात श्रोत्यांना अलगदपणे सामील करून घेतो.

मूळचा दापोलीचा असलेला सुयोग मुंबईतच वाढला. मुंबईच्याच रिझवी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलेल्या सुयोगने जर्मनीत मेकॅनिकल डिझाइनमध्ये काम केले. तिथे काम करत असताना वेगळा काहीतरी करण्याची, सृजनाची अस्वस्थता त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेतून काही ना काही करणे चालूच होते. हे तो वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांसमोर आणत होताच. मित्र मंडळ, चाहते वाढत होते. त्यातच भारतीय डिजिटल पार्टी आणि भारतीय टुरिंग पार्टी या 2 प्रसिद्ध यूटय़ूब चॅनेल्सबरोबर पण काम करून झाले. नावाला अजून वलय प्राप्त झाले आणि त्यानंतर सुयोगने 10 सप्टेंबर 2022 पासून `व्हायफळ’ हे चॅनेल सुरू केले. प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटक कलाकारांना आपल्या पॉडकास्टमध्ये बोलावणे, स्वतच्या हातची गरमागरम कॉफी पाजणे आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या बालपणापासून, वाचनापासून ते त्यांच्या नवनव्या गोष्टी शिकण्यापर्यंतच्या प्रवासाबाबत निखळ गप्पा मारणे असा साधा प्रघात यात त्याने जोपासला. त्या प्रवासात सुयोग कुठे ना कुठे आपला प्रवास पुन्हा जगत असतो. त्या प्रवासातील सापेक्ष स्थळे किंवा विरोधाभास अचंबित होऊन अनुभवत असतो. प्राची कॅमेऱयामागून हे सर्व टिपत असते.

व्हायफळच्या पॉडकास्टमध्ये आतापर्यंत रिंकू राजगुरू, संकर्षण कऱहाडे, भरत जाधव, स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी (सिनियर), वैदेही परशुरामी, संजय जाधव, सई ताम्हणकर, गिरीजा ओक, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आणि अजून खूप सारी मंडळी येऊन गेली आहेत. त्यांनी त्यांचे बालपण, त्यांच्या क्षेत्रातील संघर्ष, आयुष्याकडून मिळालेले धडे अशा खूप साऱया गोष्टींवर चर्चा केली आहे. यात भरत जाधव, संकर्षण कऱहाडे, वैदेही परशुरामी, भाग्यश्री लिमये आणि रिंकू राजगुरू सोबतच्या गप्पा तर अगदी न चुकवण्यासारख्या आहेत. संकर्षण जेव्हा त्याच्या आई-वडील, आजी-आजोबांबरोबरच्या नात्याबद्दल, लहानपणीच्या खोडय़ांबद्दल बोलतो, त्या वेळी महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय मिलेनिअल सहजपणे जोडला जातो. रिंकू जेव्हा तिला तिच्यात गरजेच्या असलेल्या सुधारणांबद्दल प्रांजळपणे बोलते, त्या वेळी सुयोगने तिला किती सहजता दिली आहे ही जाणीव होते. भरत जाधव जेव्हा त्यांनी नाटकांमध्ये साकारलेल्या पात्रांकडूनसुद्धा शिकतात हे समजल्यावर, भरत जाधव या प्रवासात माणूस म्हणून पण कसे समृद्ध होत गेले असतील याची जाणीव होते. अशा कित्येक गोष्टी आपल्याला या पॉडकास्टमध्ये पदोपदी मिळत राहतात.

सुयोगची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तो समोरच्या व्यक्तीला प्रचंड मोकळेपणा देतो. समोरच्या व्यक्तीवर गप्पांचे कोणतेच दडपण येऊ देत नाही. मुख्य म्हणजे तो पाहुण्यापेक्षा जास्त बोलत नाही. अर्थात सुयोगने संकलनाकडे अजून लक्ष दिले तर या पॉडकास्टचा प्रभाव दुणावेल हे नक्की. पॉडकास्ट ऐकताना आपल्याला जाणवते बहुतांश सेलिब्रेटीज आपल्यासारखेच सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेले आहेत. त्यांचा हा प्रवास जाणून घेताना आपण नकळत त्यांच्याशी जोडले जातो. या जोडले जाण्यासाठी लागणारा शांत, संयत पूल सुयोग बनतो. म्हणूनच त्या गप्पा फळाची चिंता कशाला म्हणत फक्त व्हायफळ किंवा वायफळ न राहता आपल्याला खूप काही बहाल करतात आणि समृद्ध करतात.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)
[email protected]

Comments are closed.