देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कॅबिनेटला तुरुंगात टाकायला पाहिजे! संजय राऊत भडकले, IND vs PAK सामन्याला कडाडून विरोध

आशिया कपमध्ये विजेतेपदासाठी रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तान भिडणार असून हा सामना पीव्हीआर सिनेमामध्ये मोठ्या पडद्यावर दाखवला जाणार आहे. याची राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि संपूर्ण कॅबिनेटला लाज वाटली पाहिजे. हिंदुस्थान-पाकिस्तान सामना पीव्हीआरमध्ये दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वांगचुक यांना पाकिस्तानशी संबंध लावत देशद्रोही ठरवले तसे अख्ख्या कॅबिनेटवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकायला पाहिजे. पीव्हीआर वाल्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असा तीव्र संताप व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीला कडाडून विरोध केला.

‘माय नेम इज खान’वेळी आम्ही पडदे जाळले होते. अजूनही खटले सुरू आहेत. पीव्हीआरला जर भारत-पाकिस्तान सामना दाखवला जाणार असेल तर तो पहायला जाणाऱ्या प्रेक्षकांचे डीएनए चेक करावे लागेल. आमच्या कार्यकर्त्यांचे यावर लक्ष असून आताच मनसेच्या नेत्यांची भूमिका आम्ही पाहिले. सर्वांनी याचा निषेध केला आहे. पण काही देशद्रोही कोडगे आपल्यामध्ये असतात, असे संजय राऊत म्हणाले

सरकार जर देशद्रोह्यांना पाठिंबा देत असेल तर तिथे संघर्ष मोठा होतो. आतापर्यंत भारत-पाकिस्तानचा सामना जनतेने पाहिलेला नाही. पण पीव्हीआर हा नालायकपणा करत आहे. याला भाजपचा आणि मिंधे गटाचा सपोर्ट आहे. मिंधे गट बाळासाहेबांचे नाव लावतो. त्यांनी भूमिका स्पष्ट करा. बोला आमचा विरोध आहे. की एकनाथ शिंदे पीव्हीआरमध्ये जाऊन सामना पाहणार आहेत? मोदी येणार आहेत, त्यांच्यासाठी ती मॅच लावली आहे का? असा सवालही राऊत यांनी केला.

नवाज शरीफकडे केक खायला जाणारे हे लोक आहेत. सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यूएनमध्ये सांगितले की, भारत आमचे शत्रूराष्ट्र आहे. अशा शत्रू राष्ट्राबरोबर आम्ही क्रिकेट खेळतोय. याची लाज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या बरोबर फोटो छापणाऱ्या फडणवीस यांना वाटली पाहिजे. अमित शहांनी बेनीमी कंपनी असणाऱ्या शिंदे गटाला वाटली पाहिजे, असेही राऊत यांनी फटकारले.

हे सगळं अत्यंत घृणास्पद आहे, आदित्य ठाकरे यांनी PVR Cinemas ला फटकारले

Comments are closed.