अहिल्यानगरमध्ये साडेतीन तासांच्या मुसळधार पावसाने दाणादाण, गोदावरीतुन 13 हजार क्युसेसने विसर्ग सुरू

अहिल्यानगरमध्ये कोपरगाव तालुक्यात पहाटे साडेपाचनंतर सुमारे तीन ते साडेतीन तास मुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसामुळे तालुक्यातील विविध भागांत अक्षरशः दाणादाण उडाली. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने पत्रे उडून पडल्याच वृत्त आहे. पडलेल्या मुसळधार पावसाने शेत जमिनी खरडून निघाल्या असून सोयाबीन मका पिकात गुडघाभर पाणी साचले असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. ओढे,नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान गोदावरी नदी पात्रात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे 13 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे.
शहरालगत असलेल्या जुनी गंगा देवी मंदिर, उक्कडगाव येथील रेणुका माता मंदिर, तसेच कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची मुसळधार पावसाने मोठी तारांबळ उडाली. पुणतांबा चौफुली ते साईबाबा कॉर्नर नगर मनमाड रस्त्यावर रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी चिखल व खड्ड्यांमुळे प्रवास अधिकच कठीण बनला आहे. वाहन चालकांना गाड्या चालवणे मुश्किल झाले होते.
ग्रामीण भागात शेतजमिनी, बंधारे आणि विहिरी उफाळून वाहू लागल्या आहेत. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता पाऊस अक्षरशः नकोसा झाला आहे.
पावसासोबत वीजपुरवठा खंडित झाला, ज्यामुळे नागरिकांना अंधारातच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने तालुक्यातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
नाशिक जिल्ह्याच्या धरण परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील धरणांचा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. रात्रीतून गोदावरी पात्रात पाणी वाढण्याची शक्यता पाटबंधारे खात्याने व्यक्त केली आहे.
गोदावरी खोऱ्यातील विविध धरणांतून शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सततच्या पावसामुळे धरणांमधील जलसाठा वाढल्याने नदी व नाल्यांमधील पाणीपातळी देखील वाढली आहे.
वाढलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीचा प्रवाह वेगाने वाढत असून, नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीपात्रात जाणे, धरणांच्या खाली मासेमारी किंवा पोहण्यासाठी जाणे टाळावे. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed.