Mumbai Amritsar Express – मुंबई-अमृतसर एक्सप्रेसच्या दोन डब्यांमधील कपलिंग तुटले, डाऊन मार्गावर 40 मिनिटे वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेमार्गावरील डहाणू स्थानकाजवळ मुंबई-अमृतसर एक्सप्रेसच्या दोन डब्यांमधील कपलिंग तुटले. मुख्य गाडी पुढे गेल्याने प्रवाशांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड स्थानका दरम्यान रविवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे डाऊन मार्गावरील वाहतूक तब्बल 40 मिनिटे ठप्प झाली होती. डबे जोडल्यानंतर एक्सप्रेस अमृतसरच्या दिशेने रवाना करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे आधीच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असताना त्यात डहाणूजवळ घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र लोकल आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तुटलेली कप्लिंग दुरुस्त करून डबे पुन्हा गाडीला जोडले.
अर्ध्या तासाच्या कामानंतर गाडीने पुढील प्रवास सुरू केला आणि सेवा पूर्ववत झाली. या अनपेक्षित प्रकारामुळे काही गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. परिणामी प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे समजते.
Comments are closed.