गरोदर महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक? डोनाल्ड ट्रम्प यांचा महिलांना गजब सल्ला
गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातला अतिशय संवेदनशील काळ असतो. या काळात आई होणाऱ्या महिलेला प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल चिंता वाटते “हे बाळासाठी सुरक्षित आहे का?”, “याचा काही दुष्परिणाम होईल का?” अशा प्रश्नांनी मन भरलेलं असतं. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत विधान केलं की, “गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉल घेऊ नये, यामुळे बाळाच्या वाढीवर दुष्परिणाम होतात.” त्यांच्या या वक्तव्यामुळे जगभरात चर्चा रंगली आणि अनेक महिलांमध्ये गोंधळ निर्माण झाला. (paracetamol during pregnancy safe or not)
पॅरासिटामॉलबद्दल भीती का निर्माण झाली?
ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अनेक गर्भवती महिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की खरंच पॅरासिटामॉल धोकादायक आहे का? कारण साधारणपणे डोकेदुखी, ताप, अंगदुखी यांसारख्या त्रासांमध्ये हे औषध सर्वसाधारणपणे दिलं जातं.
वैद्यकीय क्षेत्र काय सांगतं?
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर नामांकित संस्था स्पष्टपणे सांगतात की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भावस्थेत पॅरासिटामॉल घेणं सुरक्षित आहे. अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की योग्य प्रमाणात घेतल्यास याचा गर्भावर नकारात्मक परिणाम होत नाही. काही भीती दाखवली जाते की अशा गोळ्या घेतल्याने बाळ स्वमग्न (Autism) होऊ शकतं, पण वैज्ञानिक अभ्यासात असा कोणताही पुरावा सापडलेला नाही.
खरी काळजी कोणती घ्यावी?
1) स्वतःहून औषध घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं धोकादायक ठरू शकतं.
2) ताप, तीव्र वेदना किंवा असह्य त्रास झाल्यास डॉक्टरांनी सांगितलेली डोसच घ्या.
3) ताप वाढत राहिला आणि औषध न घेतल्यास त्याचा परिणाम गर्भातील बाळावर अधिक गंभीर होऊ शकतो.
गर्भावस्थेत पॅरासिटामॉल घेणं धोकादायक आहे, असा थेट निष्कर्ष चुकीचा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली पॅरासिटामॉल गोळी सुरक्षित आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी आपल्या आरोग्यतज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर भर द्या. आईची आणि बाळाची सुरक्षितता हाच खरा प्राधान्याचा मुद्दा आहे.
Comments are closed.