… तर ही शांत वेदना उद्या आक्रोशात बदलेल, आमदार कैलास पाटील यांचा सरकारला इशारा

धाराशिवमध्ये आलेल्या महापूरामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संसार उघड्यावर पडले असून, शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पूरात वाहून गेलेली शेती पाहून शेतकरी आक्रोश करत असताना सरकार मात्र मदत जाहीर करण्यास दिरंगाई करत आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी यावरून सरकारला फटकारले आहे. तसेच सरकारने जर लवकरात लवकर मदत केली नाही तर आत जी शांत वेदना आहे ती उद्या आक्रोशात बदलेल, असा इशारा दिला आहे.
”पंचनाम्याची नाटकं नको, हेक्टरी ५० हजार सरसकट भरपाई हवी. अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था भीषण झालेली आहे. जिथे कालपर्यंत हिरवीगार पिकं डोलत होती, तिथे आज फक्त उध्वस्त झालेली जमीन दिसती आहे, बऱ्याच ठिकाणी शेतं पूर्णपणे खरडून गेली आहेत, तर काही ठिकाणी तळ्याचं रूप धारण करून बसली आहेत. या पुराने फक्त पीकच नाही तर बळीराजाच्या स्वप्नांचाही चुराडा केला आहे. बळीराजा आज उघड्यावर आलाय, एका रात्रीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय, त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू आहेत आणि मनात उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, त्याला सावरणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने तात्काळ ठोस पावलं उचलली नाहीत, तर ही शांत वेदना उद्या आक्रोशात बदलणार आहे.. आता शेतकरी झुकणार नाही तर सरकारलाच झुकावं लागेल”, अशी पोस्ट कैलास पाटील यांनी शेअर केली आहे.
Comments are closed.