एम.सी.सी.ची भांडुपमध्ये अद्ययावत इनडोअर अकादमी, गरीब-होतकरू खेळाडूंसह 15 मुलींना स्कॉलरशिप

भांडुपमध्ये ज्वाला सिंग यांच्या एम.सी.सी. क्लबची अत्युच्च दर्जाची इनडोअर क्रिकेट अकादमी सुरू होणे ही आमच्यासाठी आणि मुंबईकरांसाठी भाग्याची गोष्ट असून, या अकादमीतून आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रिकेटपटू घडावेत, असा आशावाद स्थानिक खासदार संजय दीना पाटील यांनी या अकादमीच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केला. यशस्वी जैसवाल, पृथ्वी शॉसारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडविणाऱ्या ज्वाला सिंग यांची आता चौथी इनडोअर अकादमी भांडुपमध्ये सुरू झाली आहे.
या अकादमीत तब्बल अकरा विकेट्सपैकी सहा विकेट्स या पूर्ण 90 फूट रन अप घेऊ शकतील अशा, म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेगवान गोलंदाजांना साजेशा अशा आहेत. उत्कृष्ट लाईट्स, उत्तम विकेट्स, बॉलिंग मशीन्स याबरोबरच बाहेरच्या बाजूला आणखीन सहा आऊटडोअर विकेट्स तयार होत आहेत. पर्सनल जिम, फिटनेस सेन्टर , रिहॅब सेन्टर, टीचिंग सेन्टर (व्हिडीओ ऍनालिसिससह) येथे उपलब्ध असेल. शिवाय (मुले आणि मुली) खेळाडूंसाठी उत्तम टॉयलेट्स, कपडे बदलण्यासाठी रूम्स अशा सोयी येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवाय होतकरू पण गरीब खेळाडूंना येथे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेदेखील ज्वाला सिंग यांनी ठरवले असून गरीब-होतकरू खेळाडूंसह 15 मुलींना एम.सी.सी.ची शिष्यवृत्तीदेखील मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई संघाचे माजी प्रशिक्षक विनायक सामंत, भारताचे माजी क्रिकेटपटू राजेश पवार, ज्वाला स्पोर्ट्सचे आश्रयदाते डॉ. सत्येंद्र सिंग, एम.सी.सी.च्या संचालिका वंदना सिंग, अभिजित चव्हाण आणि एम.सी.सी. क्रिकेट अकादमीतील सर्व प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.
Comments are closed.