जोगेश्वरी पूर्वमधील अपुऱ्या, दूषित पाणीपुरवठय़ाची समस्या दूर करा, अन्यथा आंदोलन छेडणार; शिवसेनेचा पालिकेला इशारा

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील के पूर्व आणि पी दक्षिण विभागात होणाऱ्या अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठय़ामुळे रहिवासी हैराण आहेत. लवकरात लवकर ही समस्या दूर न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेच्या वतीने पालिकेला देण्यात आला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व जलाशये तुडुंब भरलेली असताना के पूर्व विभागातील पी. पी. डायस पंपाऊंड, नवलकर वाडी, मकराणी पाडा, बांद्रेकरवाडी, प्रतापनगर, मेघवाडी, आदर्शनगर, शिवटेकडी, दत्त टेकडी, पूनम नगर, कोकण नगर आदी तसेच पी दक्षिण विभागात आरे वसाहतीमधील 27 आदिवासी पाडे आणि 1 ते 32 युनिटमधील रहिवाशांना अपुरा आणि दूषित पाणीपुरवठय़ाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात पालिकेकडे तक्रार करूनही त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी पालिकेचे जल अभियंता माळवदे यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. दूषित पाणीपुरवठय़ामुळे रहिवाशांच्या जिवाशी खेळ होत आहे. याची दखल घेऊन अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठय़ाची समस्या दूर केली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा अनंत (बाळा) नर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

या बैठकीला उपविभागप्रमुख बाळा साटम, जितू वळवी, के. एल. पाठक, जयवंत लाड, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, नंदू ताम्हणकर,  बाळा तावडे, संदीप गाढवे, मंदार मोरे, उपशाखाप्रमुख उमेश राणे, शिवा अण्णा, दीपक परब यांच्यासह मोठय़ा संख्येने रहिवासी उपस्थित होते.

Comments are closed.