कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी दांपत्याची आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी मारली, अंत्यसंस्कार उरकून त्याच विहिरीजवळ पतीचा गळफास

पाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींनी शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरून आत्महत्येसारखी पावले उचलत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारी शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. पत्नीने विहिरीत उडी घेतली तर तिच्यावर अंत्यसंस्कार उरकून परतल्यानंतर त्याच विहिरीजवळ पतीने गळफास घेतला. कर्जबाजारीपणामुळे दोघांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचा संदेश त्याने व्हॉट्सअॅपवर टाकला होता.

छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 43 वर्षीय शेतकरी विलास रामभाऊ जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर 43 गुंठे जमीन होती. शेतीतून पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने ते पत्नी रमाबाई यांच्यासमवेत मजुरी करून उदरनिर्वाह भागवत होते, मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी तसेच खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. रमाबाई यांच्यावरही बचत गटाचे कर्ज होते.

कर्ज फेडायचे कसे या चिंतेत रमाबाई यांनी शुक्रवारी शेतातील विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुले आणि नातेवाईक घरी गेले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास विलास जमधडे यांनी गावापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या शेतात जाऊन व्हॉट्सअॅप ग्रुपवर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असल्याची पोस्ट केली आणि रमाबाई यांनी आत्महत्या केलेल्या विहिरीजवळील झाडाला गळफास घेतला. मेसेज वाचताच गावकऱ्यांनी जमधडे यांच्या शेताकडे धाव घेतली. तिथे झाडाला लटकलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला.

माझी प्रिय मुले…

जमधडे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर केलेला मेसेज वाचूनही अनेकांना अश्रू आवरले नाहीत. ‘मी विलास रामभाऊ जमधडे, माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या बायकोने पण काल बँकेचे कर्ज असल्यामुळे आत्महत्या केली. सुमित, अमित मला माफ करा, पण माझी शेवटची इच्छा तुम्ही आळंद येथूनच शिक्षण पूर्ण करा. माझी प्रिय मुले.’ असे त्यांनी मेसेजमध्ये लिहिले होते.

Comments are closed.