भारताचा विजय, पण ट्रॉफी नाही! फायनलनंतर तासभर थांबले खेळाडू, नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला

Asia Cup 2025 दुबईत झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं. IND vs PAK Final 2025 तिलक वर्मानं फलंदाजीत शानदार खेळी साकारत ‘मॅन ऑफ द मॅच’चा मान पटकावला, तर रिंकू सिंगनं अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत विजय निश्चित केला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही, ही मोठी अभिमानाची गोष्ट ठरली.

मात्र सामन्यानंतरचं पारितोषिक वितरण नाट्यमय वळणावर गेलं. एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री असलेले मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघानं ठाम नकार दिला. त्यामुळे विजेतेपदाचा मुकुट जिंकूनही भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी हाती घेतली नाही. नक्वी ट्रॉफी घेऊन शेवटी मैदानातून बाहेर पडले, आणि भारतीय संघानं ट्रॉफीशिवायच जल्लोष केला.

काही खेळाडूंनी वैयक्तिक पुरस्कार अन्य मान्यवरांच्या हस्ते घेतले. परंतु पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश मात्र नक्वींकडून स्वीकारला. यावेळी पाकिस्तानी संघ जवळपास 55 मिनिटे ड्रेसिंगरूममध्येच थांबला होता, तर नक्वी व्यासपीठावर एकटेच उभे होते.

भारताच्या भूमिकेचं कारण ठाम होतं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी संपूर्ण मालिकेत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन, नाणेफेकीपूर्वी फोटोशूट आणि अखेरीस ट्रॉफी स्वीकारणं नाकारलं. या भूमिकेमुळे भारतीय संघाने मैदानाबाहेरही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “मी क्रिकेट पाहतोय तेव्हापासून कधीही असं घडलं नव्हतं की विजेत्या संघाने ट्रॉफी नाकारली आहे. आम्ही ती जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, पण खरी ट्रॉफी म्हणजे आमचा संघ आणि ड्रेसिंग रूममधले खेळाडू आहेत. ही स्पर्धा आमच्यासाठी एक गोड आठवण ठरणार आहे.”

या घटनेनं आशिया कपचा निकाल जरी भारताच्या नावावर गेला असला, तरी ट्रॉफी नाकारणं हा इतिहासात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला आहे. कदाचित हा प्रसंग आशियाई क्रिकेटमधील नवा अध्याय ठरू शकतो.

Comments are closed.