IND vs PAk : आशिया कप विजयानंतर सूर्यकुमार यादवचा मोठा निर्णय, मानधन भारतीय लष्कराला अर्पण

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या ऐतिहासिक लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप 2025 वर आपलं नाव पुन्हा एकदा कोरलं. या स्पर्धेच्या 41 वर्षांच्या प्रवासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आणि त्या निर्णायक सामन्यात भारताने 5 गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने एकूण नऊव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले.

या रोमांचक विजयात तिलक वर्मा चमकून पुढे आला. त्याने संयमी आणि धडाकेबाज खेळ करत शेवटपर्यंत क्रीजवर राहून भारताला विजय मिळवून दिला. दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादव अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही; तो फक्त 1 धाव काढून बाद झाला. पण त्याच्या मैदानाबाहेरील मोठ्या निर्णयामुळे तो चाहत्यांच्या मनात अधिक उंचावला.

फायनलनंतर सूर्यकुमार यादवने आपल्या मानधनाची संपूर्ण रक्कम भारतीय लष्कराला देण्याचा निर्णय घेतला. त्याने हा निर्णय घेत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. त्याच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

भारताच्या विजयानंतर संघाला 3 लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे 2.6 कोटी रुपये) बक्षीस मिळालं. त्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतःच्या मानधनाचा त्याग करून ते लष्कराला अर्पण केलं.

सामन्यानंतर तो म्हणाला “क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून मी असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं. आम्ही जिंकलेली ही ट्रॉफी सहजासहजी मिळालेली नाही. या स्पर्धेसाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली, सलग उत्तम सामने खेळलो आणि शेवटी त्याचं फळ मिळालं. पण माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे ड्रेसिंग रूममधले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आहेत. हीच ती खरी संपत्ती आणि आठवण आहे जी कायम माझ्यासोबत राहील.” भारताचा विजय, तिलक वर्माची शौर्यगाथा आणि सूर्यकुमारचा मानवीय निर्णय या तिन्ही गोष्टींमुळे आशिया कप 2025 फायनल भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.

Comments are closed.