अमृतसर एक्स्प्रेस डबे सोडून पळाली; डहाणूजवळ कपलिंप तुटले; पाऊण तास वाहतूक ठप्प, रविवार ठरला ‘लटकवार’

रविवार पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी ‘लटकवार’ ठरला. कपलिंग तुटल्याने अमृतसर एक्स्प्रेस दोन डबे मागे सोडून पळाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी दीडच्या सुमारास डहाणू स्थानकाजवळ घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाऊण तास वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक पूर्णपणे कोलमडून पडली.
मुंबईहून अमृतसरच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस दीडच्या सुमारास डहाणू स्थानकाच्या पुढे निघाल्यानंतर गाडीचे कपलिंग तुटले. त्यामुळे ही एक्स्प्रेस अठरा डब्यांसह साठ ते सत्तर फुटांपर्यंत धावली. मात्र लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक कोलमडून पडली. या घटनेमुळे एक्स्प्रेससह लोकल गाड्यांच्या एका मागोमाग एक रांगा लागल्या होत्या. कपलिंग तुटल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक दुरुस्ती करणाऱ्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. कपलिंग जोडण्यासाठी बराच वेळ गेला.
प्रवाशांनी उड्या मारल्या
कपलिंग तुटल्याने एक्स्प्रेसचे दोन भाग झाले. मात्र तेव्हा अमृतसर एक्स्प्रेसचा वेग कमी होता म्हणून मोठी दुर्घटना टळली. काही प्रवाशांनी एक्स्प्रेसमधून खाली उड्या मारल्या. एक्स्प्रेसच्या लोको पायलटने तातडीने रेल्वे थांबवली. पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर एक्स्प्रेसचे कपलिंग जोडून अमृतसर एक्स्प्रेस रवाना झाली. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
Comments are closed.