अकार्यक्षम, हतबल आमदार क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा, शिवसेना उपनेते संजय पवार यांची मागणी

शिंदे गटाचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहराच्या दुर्दशेचे सर्व खापर प्रशासनावर न फोडता एक लोकप्रतिनिधी म्हणून आपणही तेवढेच जबाबदार आहात, हे विसरू नये. या सर्व गंभीर बाबींचे आत्मपरीक्षण करावे व जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.
कोल्हापूर शहराचे अनेक वर्षे क्षीरसागर हे प्रतिनिधित्व करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राज्य नियोजन मंडळ (कॅबिनेट मंत्री दर्जा) या पदावर अजून काम करत असतानाही शहरातील कोणताही अत्यावश्यक असणारा मूलभूत प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. कोणतेही दर्जेदार काम करून घेऊ शकले नाहीत, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.
काल झालेल्या प्रशासकीय बैठकीत प्रशासनावरील सुटलेला ताबा व हतबलता पाहाता, भविष्यात त्यांच्या हातून येथील कोणताही प्रश्न मार्गी लागू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. रस्त्यांसाठी घोषणा केलेल्या 100 कोटींसह विविध विकासकामांसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी आल्याच्या घोषणा झाल्या; पण कोल्हापूरकरांचे सर्वच बाबतीत स्वप्नभंग व निराशाच झाली आहे. कालची झालेली प्रशासकीय झाडाझडती ही मिलिभगत असून, निवडणुकीच्या तोंडावर केलेले हे महानाटय़ व स्टंटबाजी असून, हे न कळण्याइतपत जनता खुळी नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने सुमारे सोळा वर्षे जबाबदार पदांवर काम करत असताना कोल्हापूर शहरवासीयांना दर्जेदार रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ मुबलक पाणी, आरोग्यसेवा, चांगले सुसज्ज बगीचे, क्रीडांगणे आदी मूलभूत दर्जेदार सुविधा देऊ शकला नाहीत, हे कोल्हापूरकरांचे दुर्दैव असल्याचे या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
Comments are closed.