Ahilyanagar Rain – सीनेचे पाणी अहिल्यानगरात शिरले; पूरस्थिती कायम

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. सीना नदीला पूर आला असून, सीनेचे पाणी अहिल्यानगरात घुसले आहे. शहरातील नेप्ती नाका परिसरात पुराचे पाणी पसरल्याने पर्यायी मार्गाचा वापर सुरू आहे. नगर-कल्याण व नगर-मनमाड महामार्ग हा बंद करून दुसऱया मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. जिल्ह्यातही पावसाचे थैमान सुरू असून, अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील रस्ता वाहून गेला आहे, तर राहाता तालुक्यातील गावांमध्ये जाणारे रस्ते बंद झाले. शेवगाव आणि कर्जतमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले, तर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अनेकांना सुखरूप बाहेर काढले जात आहे. दरम्यान, पाथर्डी व शेवगाव तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे. अनेक तालुक्यांमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे.

सीना नदीला आलेला पूर आणि सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील नेप्ती नाका परिसरात पुराचे पाणी पसरल्याने पर्यायी मार्गाचा वापर सुरू आहे. शहरात नालेगाव परिसरामध्ये पाचजण पाण्यामध्ये अडकले होते. त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले.

अहिल्यानगर शहरामध्ये सीना नदीला पूर आला असून, अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. पंधरा-वीस वर्षांनंतर अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पाण्यामुळे नगर-कल्याण महामार्ग बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणची वाहतूक बंद केली असून, दुसऱ्या मार्गाने वाहतूक सुरू केली आहे.

अनेक ठिकाणी बसेस बंद

ग्रामीण भागामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे शहरांमध्ये जाणारे रस्ते हे बंद करण्यात आले होते. त्यामुळे एसटी बस व्यवस्थाही कोलमडून पडली. अनेक ठिकाणी बस बंद केल्यामुळे प्रवासांचे मोठय़ा प्रमाणामध्ये हाल झाले. वेळेचे नियोजन कोलमडल्यामुळे तासन्तास लोकांना
बसस्थानकामध्ये अडकून पडावे लागले.

अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक बंद

उत्तरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने नगर-पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

महापालिकेचे नियोजन कोलमडले

शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. तेथील गटारे, ड्रेनेज उघडे आहेत. दोन दिवसांच्या पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये घाण पाणी गेल्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील नालेगाव, रविश कॉलनी, बागरोच्या हाडको यांसह विविध ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. जिल्हा प्रशासनाने येथील लोकांना दुसरीकडे स्थलांतरित केले.

मुळा धरणाचा विसर्ग दुप्पट

शनिवारी सकाळी मुळा धरणातून सोडण्यात येणाऱया पाण्याचा विसर्ग दोन हजार क्युसेक होता. दुपारी तीन वाजता तो पाच हजार करण्यात आला. सायंकाळी हा विसर्ग 15 हजार करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले.

अमरधामध्ये पाण्यातच अंत्यविधीची वेळ

सीना नदीचे पाणी थेट अमरधाममध्ये घुसल्याने आज एक अंत्यविधी पाण्यामध्ये करण्याची वेळ त्या कुटुंबावर आली. नालेगाव भागात असलेल्या अमरधाममध्ये आज मोठय़ा प्रमाणामध्ये पाणी साचलेले होते. पाणी इतके प्रमाणामध्ये होते की, येथे अंत्यविधी करण्यात अडचण निर्माण झाली होती.

खासदार लंके यांनी दिली मदत

खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर शहरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील नालेगाव, दातरंगे मळा, ठाणगे मळा, बागरोजा हडको यांसह केडगाव, एमआयडीसी, बालिकाश्रम रोड भागांची पाहणी केली. यावेळी लंके यांनी ज्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे, त्या कुटुंबीयांना भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून कुटुंबीयांना धीर देण्याचे काम केले. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, विक्रम राठोड, दिलदारसिंग बीर, गिरीश जाधव, मंदार मुले, राकेश बोगवट, प्रथमेश महिंदरकर, ओम काले, शुभम मिरांडे, महेश शेलके, अक्षय नागपूरे उपस्थित होते.

84 मंडळांत अतिवृष्टी; 3497 जणांचे स्थलांतर, 60 नागरिकांची सुटका

n अहिल्यानगर जिह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे 124पैकी 84 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3497 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने 60 नागरिकांची सुखरूप सुटका केली.

नागरिकांचे स्थलांतर

महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने अहिल्यानगर तालुक्यातील नऊ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. जामखेड तालुक्यात 42, कर्जत 456, कोपरगाव 200, नेवासा 659, राहुरी 498, संगमनेर 84, शेवगाव 76, श्रीरामपूर 74, तर राहाता तालुक्यातील 1399 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

शिवसेना मदतीसाठी पुढे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक हे जनतेच्या मदतीसाठी धावून आले. युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहरप्रमुख किरण काळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनी अनेक भागांमध्ये जाऊन अडकलेल्या लोकांना मदत केली.

पिंपळगाव तलाव भरला

पिंपळगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे सीना नदीच्या पाणीपातळीत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे जाणाऱयांनी दुसऱया मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.